चाकण शहरामध्ये अद्यापही उलटसुलट चर्चेला उधाण
नगरपरषदेने केलेल्या पाहणीत काही अनाही
चाकण – चाकण नगरपरिषदकडून परिसरातील ओला व सुका कचरा उचलताना शुक्रवारी (दि. 7) हाताचा तुटलेला पंजा सापडला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर पोलिसांनी नगरपरिषदेला चाकण व परिसरातील कचरा कुंड्या व बिरदवडी येथील डम्पिंग ग्राउंडवर पाहणी करण्याचे सुचवले होते. त्यानुसार पाहणी करण्यात आली; मात्र काही मिळून आले नाही. तर आता हा पंजा रुग्णालयातून आला आहे का? यादृष्टीने तपास सुरू आहे. मात्र, हा तुटलेला पंजा नक्की कोठून आला याबाबत चर्चला उधाण आले आहे. तर हा पंजा डीएनए परिक्षणासाठी पुढे पाठवून देण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चाकण नगरपरिषदेच्या वतीने शहरात घरोघरी तयार होणारा ओला व सुका कचरा नगरपरिषदेच्या वतीने घंटागाडीतून गोळा केला जातो. चाकण नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून या पद्धतीने कचरा गोळा केला जात आहे.
शुक्रवारी येथील प्रभाग क्रमांक 18 मध्ये दत्तात्रेय गायकवाड यांनी आपली कचरा गोळा करण्यासाठीची घंटा गाडी (एमएच 14 ई ए 7375) या प्रभागातील माळआळी, बाजारपेठ व परिसरात घरोघरी जाऊन कचरा गोळा केल्यानंतर कचऱ्याने घंटागाडी भरल्याने खाली करण्यासाठी बिरदवडी येथील खाणीत नेली.
या वाहनातील कचरा खाली करताना पिशवीत बांधलेला मनुष्याच्या हाताचा पंजा दिसला. या पंजाला रक्त लागलेले असून तो सुकलेला असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चाकण पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी बिरदवडी येथील घटनास्थळी जाऊन पहाणी केली होती. दरम्यान, शनिवारी (दि. 8) नगरपरिषदेने काय कार्यवाही केली याबाबत चाकण नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुखांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी काहीही उत्तर
दिले नाही.