महाबळेश्‍वरमध्ये ब्रिटीशकालिन पुल खचतोय

महाबळेश्‍वर – येथील ग्लॉन ओगल डॅमवरील ब्रिटीशकालिन पुल खचू लागला असून या पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वेळीच या पुलाच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही तर महाबळेश्‍वरकडून तापोळ्याला जाणाऱ्या सर्व वाहतुकीवर परीणाम होणार आहे. या पुलाला पर्यायी मार्ग अतिशय अरूंद असल्याने तेथून वाहतूक सुरू ठेवणे हे वाहन चालकांच्या व पोलिसांच्यादृष्टीने मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे पालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी या पुलाकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाबळेश्‍वरच्या पाणी पुरवठ्यासाठी इंग्रजांनी वेण्णाधरणाला पर्यायी व्यवस्था म्हणून ग्लॅन ओगल हे छोटे धरण बांधले आहे. या धरणातून आजही पावसाळ्यात महाबळेश्‍वर शहरास पाणी पुरवठा केला जातो. या धरणात पाणी येण्याच्या मार्गावर ब्रिटीशांनी मातीचा भराव दगडी बांधकाम यांच्या मदतीने पुल बांधला आहे आता हा पुल जुना झाला असून पुलाखालील दगडी बांधकाम ढासळू लागले आहे. दगडी बांधकामाने आपली जागा सोडल्यामुळे हा पुल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुल कोसळू नये याची आतापासूनच खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा मोठा अनर्थ ओढवू शकतो. जर हा पुल कोसळला तर तापोळा या विभागातील अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भागातील पर्यटनावर व तेथील व्यवसायावर परिणाम होवू शकतो. या पुलाला पर्यायी मार्ग हा वरच्या सोसायटीमधून जातो. हा रस्ता अतिशय नागमोडी अरूंद व तीव्र उताराचा आहे. पावसाळ्यात धरणाकडे जाणारा रस्ता खचल्यानंतर या पर्यायी रस्त्याचा वापर केला जात होता. परंतु, त्यावेळी अवजड वाहने हमखास अडकून पडत होती. समोरासमोर दोन मोठी वाहने आली तर बराच काळ वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर होते. टॅक्‍सीचालक अशा वेळी पर्यटक तापोळ्याला घेवुन जाण्याचे टाळतात. त्यामुळे पर्यायी मार्ग हा वाहनचालकांच्या व पोलिस विभागाच्या डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. ही वेळ येण्यापूर्वीच या पुलाच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी पालिकेने घेतली पाहिजे.

जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून या पुलाशेजारी नविन पुल बांधण्याचे नियोजन आतापासुन पालिकेने करण्याची आवश्‍यक्‍ता आहे. नवीन पुलाला शासनाकडुन निधी मिळविण्याचा प्रयत्न पालिकेने केला पाहिजे. पालिकेत भाजप सत्तेवर येवून दीड वर्षे झाली. या दीड वर्षात भाजप सरकारने पालिकेच्या विकासासाठी एक दमडीही दिली नाही, असा आरोप उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी सहा महिन्यांपूर्वी केला होता. आता दोन वर्षातही या स्थितीत काहीच फरक पडला नाही आणि आता पुढील काळातही राज्य शासनाची आर्थिक स्थिती पाहता शहर विकासाठी निधी मिळेल याची सुतराम शक्‍यता दिसत नाही. तरीदेखील पालिकेने पर्यायी पुलाचा आराखडा तयार करून तो बांधण्यासाठी आवश्‍यक ते कार्यालयीन सोपस्कार पूर्ण करावेत, अशी मागणी शहरातून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)