रिक्षा चालकांच्या आंदोलनात फूट

रिक्षा पंचायतसह प्रमुख संघटना बंदमध्ये सहभागी होणार नाहीत


विविध समस्यांबाबत परिवहन कार्यालयावर आज निदर्शने

पुणे – ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्‍त कृती समितीने मंगळवारी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. पण, यात रिक्षा पंचायतसह प्रमुख संघटना सहभागी होणार नसल्याचे रविवारी सांगण्यात आले. त्यामुळे या आंदोलनात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ऑटो रिक्षाचालकांच्या विविध समस्यांबाबत सोमवारी पुणे परिवहन कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत.

ओला-उबेरच्या बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा, रिक्षा विमाहप्ता जोखमीइतकाच आकारा, रिक्षा पासिंगमधील अडचणी दूर करा, रिक्षा खुला परवाना बंद करा, वाहन संख्येला आळा घालून शहर वाचवा इ.प्रमुख मागण्यांसाठी रिक्षा पंचायत आरटीओसमोर सोमवार दुपारी अडीच वाजता निदर्शने करणार आहे. दरम्यान, मंगळवारच्या संपाबद्दल रिक्षा पंचायत कार्यालयात पंचायतीसह प्रमुख संघटनांची बैठक रविवारी झाली. त्यात 9 जुलैच्या बंदमध्ये सहभागी न होता रिक्षा सेवा सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला. पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आप रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे संजय कवडे, रिपब्लिकन वाहतूक संघटनेचे अजीज शेख, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवडचे अशोक मिरगे आदी पुणे,पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बैठकीतील प्रमुख मुद्दे
रिक्षा चालकांच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या प्रश्‍नांविषयी बैठकीत चिंता आणि शासनाच्या धोरणाविषयी संताप व्यक्त करण्यात आला. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपस्थित संघटनांनी एकजूट व्यक्त केली. रिक्षा चालकांच्या प्रश्नांचे भांडवल करून आपली तुंबडी भरणाऱ्या धंदेवाईक संघटना, एजंट पुढाऱ्यांचा निषेध करण्यात आला. याच धंदेवाईक एजंट संघटनांनी रिक्षा परवाना खुला करण्याची मागणी केली होती. परवाना खुला झाल्यावर यातील पदाधिकाऱ्यांनी रिक्षा विक्रीची एजन्सी सुरू केली. आता रिक्षांची संख्या प्रचंड वाढून रिक्षासेवेचा बट्ट्याबोळ झाला त्यामुळे यांनी परवाना थांबवा, अशी मागणी सुरू केली आहे, असे आरोप या बैठकीत करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)