वाई तालुक्यातील घटना; मुलास तीन दिवसांची पोलीस कोठडी
दक्षिण काशीत चाललयं तरी काय?
वाई हा शेती, निसर्ग तसेच वैचारिक पातळीवर समृध्द असलेला तालुका आहे. देशभरात वाईची ओळख दक्षिण काशी म्हणून आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून वाई तालुक्यात घडलेल्या घटना पाहता दक्षिण काशीत नेमकं चाललयं तरी काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
भुईंज – वाई तालुक्यातील एका गावात गुरुवारी रात्री मुलानेच आईवर अत्याचार केल्याची चीड आणणारी तसेच माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, भुईंज पोलीस ठाण्यात या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने नात्याला काळीमा फासला गेल्याने संशयितांविरुद्ध जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेतील पीडित महिला तिच्या पतीसोबत एका लग्नाचा कार्यक्रम असल्याने तिकडे गेले होते. तेथील गावदेव करून झाल्यावर महिला एकटीच घरी पुढे आली. यावेळी तिचा मुलगा हा घराच्या ओट्यावर बसला होता. संशयिताची आई घरात गेल्यानंतर तीचा मुलगा ही घरात गेला व त्याने आतून कडी लावली. यावेळी त्याने जबरदस्ती करत स्वत:च्या आईवर अत्याचार केला. यावेळी आरडाओरडा सुरू झाल्याने परिसरातील शेजारी तेथे जमा झाली.
यानंतर शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती संशयिताच्या वडिलांना दिली. त्याच्या वडिलांनी मुलाला केल्या कृत्याचा जाब विचारून यामध्ये हस्तक्षेप केला असता मुलाने वडिलांनाही दगड मारून जखमी केले. घडलेल्या घटने नंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेतली. स्वत:च्या मुलानेच केलेल्या या घृणास्पद कृत्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळात भुईंज पोलीसांनी आरोपीच्या तात्काळ मुसक्या आवळल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत या करत आहेत.