भाजपच्या राजकीय भुंकपाचे आघाडीला दिल्लीपर्यंत धक्के- प्रा. राम शिंदे

पालकमंत्री प्रा. राम शिंदे : जिल्ह्यात भाजप-शिवसेना-विखे ताकदीचा उदय 

नगर: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाने राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खिंडार पडले आहे. या राजकीय भुकंपाचे धक्के दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचल्याने आघाडी हतबल झाली आहे, असे सांगून दोन्ही मतदार संघातील उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणकोणती यंत्रणा काम करते याचा विचार न करता भाजप-शिवसेना-विखे अशी ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे नगर दक्षिण आणि शिर्डी मतदार संघातील उमेदवारच विजयी होती. डॉ. विखे पाटील यांचा विजय हा राज्यातील सर्वाधित मताधिक्‍यांनी निवडून आणण्याची निर्धार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

नगर येथे शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, उपसभापती विजयराव औटी, माजी मंत्री बबनराव पाचपुचे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, भाजपचे प्रदेश सदस्य ऍड. अभय आगरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, “कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राजकीय धक्‍क्‍यांमागे धक्के बसू लागले आहेत. देशासह राज्यातील राजकीय वातावरण बदलत आहे. हे सर्वांच्या लक्षात आले आहे. भाजप करत असलेल्या राजकीय भूकंपाचे धक्के कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिल्लीपर्यंत जाणवले आहेत. त्यामुळे आघाडी मेटाकुटीला आली आहे. हतबल झाली आहे. सैरभैर होऊन दिशाहीन झाली आहे. डॉ. विखे पाटील यांच्यापाठोपाठ मोहिते पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.’ या निवडणुकीत भाजप-शिवसेना-विखे अशी त्री-शक्ती एकत्र आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघाचे उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. डॉ. विखे पाटील राज्यात सर्वाधिक मताधिक्‍यांनी निवडून येतील, असे काम करायचे आहे. देशात व राज्यात भाजप सरकार आहे. दोन्ही पातळीवर लोकहिताचे अनेक निर्णय होऊन ते प्रत्यक्षात उतरविले आहेत. ते फक्त लोकापर्यंत पोहचवायचे आहेत, असेही ते म्हणाले.


विखेंची त्यांना आणि आपल्याला गरज!

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षातील प्रवेश राज्यात एक संदेश आहे. विखे पाटील यांना आपली गरज आहे, तशीच त्यांची देखील आपल्याला गरज आहे, असेही पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले.


दक्षिणेची माझ्यावर जबाबदारी : कर्डिले

मी अनेक पक्ष फिरलो आहे. भाजपमध्ये आल्यावर मात्र पश्‍चातापाची वेळ आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दक्षिणेची जबाबदारी दिली आहे. ती यशस्वी पार पाडू, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.


त्यांचा प्रवेश टप्प्याटप्प्याने : औटी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची पत्नी जिल्हापरिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील हे भाजपमध्ये कधी येणार, हे प्रश्‍न टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, असे विधानसभेचे उपसभापती विजयराव औटी यांनी सांगितले.


डॉ. विखे पाटलांचा माफीनामा

तीन वर्षापासून लोकसभेची तयारी करत आहेत. या काळात अनेक नेत्यांवर व पदाधिकाऱ्यांवर कळत-नकळत टिका केली. त्यातून आपले मन दुखावले गेले. त्यासाठी माफी मागतो, असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.


कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष युती मेळाव्याला
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी युती मेळाव्यात हजेरी लावून, विखे पाटलांना निवडून देण्याचे आवाहन केले. श्रीगोंदे तालुक्‍यातून डॉ. विखे पाटील यांना जास्तीत जास्त निवडून देऊ, असे काम करणार असल्याचे ते म्हणाले.


युतीचा 26 तारखेला महामेळावा

नगर दक्षिण व शिर्डी मतदार संघातील उमेदवारांच्या प्राचाराची रणनीती ठरविण्यासाठी मंगळवारी (ता. 26) सायंकाळी चार वाजता नंदनवन लॉनमध्ये महामेळावा होईल, अशी घोषणा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)