भाजपकडून माढाचा तिढा कायमच

रणजितसिंह, जानकर आणि रोहन देशमुखांच्या नावांची चर्चा

सोलापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्यानंतर देशभरात चर्चेत आलेला माढा मतदार संघातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधूं संजय शिंदे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचे चिरंजीव रोहन देशमुख आणि सातारचे रणजित नाईक-निंबाळकर यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. संजय शिंदे यांनी टक्कर देण्यासाठी सुभाष देशमुख हा पर्याय ठेवण्यात आला होता. मात्र त्यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितल्याने आता वरील नावांची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवारीचा तिढा सुटला असला तरी भाजपच्या उमेदवारीचा तिढा मात्र अद्यापसुद्धा सुटलेला नाही.

माढा मतदारसंघाची रचना झाल्यानंतर या मतदार संघातून सर्वप्रथम शरद पवार यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील खासदार झाले. आता संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. आजमितीला शिंदे यांना टक्कर देणारा भाजपाकडे उमेदवार नसल्याने सध्यातरी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे पारडे जड वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच सातारा जिल्हा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. तसे झाल्यास रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे माढाचे उमेवार असतील, असे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)