महाआघाडीचा संयुक्त प्रचाराचा नारळ उद्या फुटणार

राहुल गांधी, शरद पवार, खर्गे आदि नेत्यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई – सत्तेत असूनही एकमेकांविरोधात सतत भांडणारे शिवसेना आणि भाजपाची युतीसाठी हातमिळवणी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ बुधवार, 20 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये फुटणार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या जाहीर सभेत प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेसाठी कॉंग्रेसने जय्यत तयारी केली आहे.

नांदेडमध्ये जय्यत तयारी
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांची राज्यातील ही पहिलीच संयुक्त प्रचार सभा असल्यामुळे या सभेची नांदेडमध्ये जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. या सभेनंतर 23 फेब्रुवारी रोजी परळी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने अशाच पध्दतीने महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे. नांदेड येथे होर्णा-या या सभेस कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-पीआरपी व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येंनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.

नांदेड येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवारी सायंकाळी 5 वाजता ही संयुक्त प्रचार सभा आयोजित केली आहे. या संयुक्त प्रचार सभेस अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लीकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात कॉंग्रेसचे प्रभारी खासदार राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री आ.डी.पी.सावंत आदींची उपस्थिती लाभणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)