आ. बच्च कडू : आरपारच्या लढाईसाठी शेतकऱ्यांनी तयार व्हा
फलटण – पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने हे आमदार खासदार यांचे असल्याने त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्यासाठी सरकार दबाव आणीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणून प्रत्येक वर्षी उसाच्या दरासाठी आंदोलने उभारली जातात. मात्र त्यातून शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. माझे नाव कडू असून यापुढची लढाई ही आता गोड सारखरेशी असल्याचे सांगत उस उत्पादक शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईसाठी तयार व्हा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. प्रहार संघटनेच्यावतीने सुरु करण्यात येणाऱ्या संवाद यात्रेसाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आ. बच्चू कडू म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात आज साखर कारखाने हे आमदार, खासदार यांचे आहेत. यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या कारखानदारांनी शेतकऱ्यांना कितीही लुटले तरी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप केला. केंद्र सरकारने स्वच्छता अभियान राबविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली. यामध्ये फक्त नौटंकी केली आहे, मात्र शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. मी कडू आहे यापुढे माझी लढाई या गोड साखरेशी असणार आहे त्यामुळे कारखाना व त्यांना मिळणारा फायदा याची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. यामुळे केंद्र सरकारने सांगितले आहे की दीड पट हमीभाव देऊ मग आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3700 रुपये भाव द्या अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी अमीर खान व नाना पाटेकर यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करताना सांगितले की तुम्हाला मदत करायची आहे तर शेतकऱ्यांना करा.
अपंग लोकांना राज्य सरकार व केंद्र सरकार कोणतीही मदत करीत नसल्याने विविध मागण्यासाठी येत्या 9 ऑगस्टला दिल्ली येथे आंदोलन करणार असल्याचे आ. कडू यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकार अपंगांच्याबाबतीत दुजाभाव केला असल्याचा आरोप आ. कडू यांनी केला आहे. त्यामुळे अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे आंदोलने केली जाणार असून आरपारची लढाई लढण्याचा निर्धार आ. बच्चू कडू करत ते म्हणाले, युती, आघाडी करायची का नाही? ते अजून ठरले नाही. मात्र कमीतकमी पाच आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या बरोबर चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी सातारा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.