डीबीटी बैठकीत निर्णय : खाती झिरो बॅलन्सही करणार
पुणे – महापालिका शाळांमधील सुमारे 91 हजार मुलांना मागील वर्षी शालेय साहित्य तसेच गणवेश खरेदीचे अनुदान “डीबीटी’द्वारे देण्यात आले होते. त्यातील सुमारे अडीच हजार मुलांचे पैसे चुकीची बॅंक खाती तसेच अपुऱ्या माहितीमुळे परत आले होते. हा प्रकार टाळण्यासाठी यावर्षी शाळा सुरू होण्यापूर्वीच या सर्व चुका दुरूस्त करण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणाऱ्या “डीबीटी’ अनुदानासाठीची आढावा बैठक अग्रवाल यांनी सोमवारी घेतली.
माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह भांडार विभाग, लेखापाल विभाग तसेच संगणक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मागील वर्षी पालिकेकडून पहिल्यांदाच थेट मुलांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी अनेक बॅंकांची झिरो बॅलन्स खाती नसल्याने बॅंकांनी मुलांचे पैसे काढून घेतले, अनेक मुलांची चुकीची खाती क्रमांक टाकली गेल्याने त्यांना पैसे न येणे, अनेक मुले संस्थांमध्ये राहात असल्याने त्यांची खाती नसणे अशा अनेक समस्या समोर आल्या होत्या.
यावर्षी या समस्या येऊ नयेत त्यावर उपाय काय असावेत यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने परत आलेल्या पैशांमुळे मुलांना साहित्यापासून वंचित रहावे लागले असल्याने यंदा ही चूक होणार नाही याबाबत विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, शाळा सुरू झाल्यानंतर पटसंख्या निश्चित करण्याची वाट न पाहता शाळांमध्ये सध्या जेवढा प्रवेश झाला आहे. त्यांची यादी करून 30 जूनपूर्वी त्या मुलांच्या खात्यात कोणत्याही स्थितीत रक्कम जमा व्हावी यासाठी तातडीने काम हाती घेण्याच्या सूचनाही माध्यमिक व प्राथमिक विभागास देण्यात आल्या आहेत.