प्राधिकरणाच्या पाच हजार घरांच्या प्रकल्पाचा “श्रीगणेशा’

विविध पेठांमध्ये प्राधिकरण बनवणार 14 हजार घरे

पिंपरी – प्राधिकरणाच्या हद्दीतील विविध पेठांमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने 14 हजार घरे बनवण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच हजार घरांच्या सर्वांत मोठ्या प्रकल्पास सुरुवात झाली आहे. भोसरी येथील गृहप्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ प्राधिकरणने केला आहे. 14 हजार घरांच्या प्रकल्पांमध्ये भोसरी येथील प्रकल्प सर्वांत मोठा आहे. या प्रकल्पाद्वारे प्राधिकरण 5 हजार घरे उभी करणार आहे. या प्रकल्पाची पाया खोदणीचे काम प्राधिकरणने सुरु केले आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापनाच शहरातील मध्यम आणि गरीब वर्गांना चांगली घरे बनवून देण्यासाठी झाली होती. परंतु गेल्या कित्येक वर्षांत प्राधिकरणाचा मूळ उद्देश कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे पडत होता. यामुळे कित्येकदा प्राधिकरणास नागरिकांची व सामाजिक संस्थांची टीकाही सहन करावी लागत होती. परंतु आता प्राधिकरणाने गृहनिर्माणाचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी भोसरी येथील प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्‍त ठरणारा आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणने नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधिकरणच्या 17 निवासी भूखंडावर 14 हजार 500 घरे बांधण्याचा निर्णय घेतला होता. ही घरे विविध पेठांमध्ये बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार, गृहप्रकल्पासाठीची कागदोपत्री प्रक्रिया, विविध परवाने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्व प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापक, सल्लागारही नेमण्यात आले आहेत. प्राधिकरणाने भोसरी पेठ क्रं. 1, 6, 10, 12, वाल्हेकरवाडी पेठ क्र. 32 आणि शिंदे वस्ती, रावेत येथे पेठ क्रं. 29 येथील निवासी भूखंडावर हे गृहप्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

यापैकी भोसरी येथील पेठ क्र. 12 मध्ये सर्वाधिक घरांचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध उत्पन्नगटातील नागरिकांना 9 हजार 500 घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी उद्यान, शाळा, व्यावसायिक गाळे आदी सुविधा प्राधिकरण उपलब्ध करुन देणार आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या वाल्हेकरवाडी येथील पेठ क्र.32 मधील गृहप्रकल्पामध्ये 792 घरे बांधण्यात येणार आहेत. हे काम या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर नागरिकांना भाडेपट्टा उपलब्ध होणार आहे.

सध्या, प्राधिकरणने भोसरी येथील पेठ क्र. 12 मधील भूखंडाचे काम हाती घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या घरांचा पाया खोदण्याच्या कामाला सरुवात झाली आहे. हा प्रकल्प देखील पूर्वी वादात अडकल्याने काम रखडले होते. मात्र, आता हा वाद संपल्यानंतर प्राधिकरणने स्वत:च हा प्रकल्प हाती घेऊन कामाला सुरवात केली आहे. या जागेवर पहिल्या टप्प्यात 4 हजार 901 घरांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

आचारसंहितेमुळे गाजा-वाजा नाही

आचारसंहिता लागू होण्यापुर्वीच संबंधित प्रकल्पाचे कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे हे काम करण्यासाठी प्राधिकरणला आचारसंहिताचा कोणताही अडथळा आला नाही. कामाच्या उद्‌घाटनासाठी राजकीय पदाधिकारी आले असते तर मात्र आचारसंहिताचा अडथळा आला असता. ही बाब ओळखून प्राधिकरणने भूमिपूजन वैगरे औपचारिकता आणि कोणताही गाजा-वाजा न करत या मोठ्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. निवडणूका संपेपर्यंत पाया खोदण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्‍वासही अधिकाऱ्यांनी व्यक्‍तकेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)