पिंपरी – “पोलीस तक्रार घेत नाहीत, मी येथेच जीव देते’, असे म्हणत 50 वर्षीय महिलेने पोलीस आयुक्तालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला रोखले. पोलीस आयुक्तालयासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिलेने आचानक केलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करुन संबंधित महिलेला रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
अनिता गायकवाड (वय 50) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर पोलीस हवालदार हनुमंत बांगर यांनी अनिता यांच्याविरोधात फिर्याद दिली असून आत्महत्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता गायकवाड यांचा त्यांच्या बहिणीशी संपत्तीवरुन वाद आहेत. त्या निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेल्या होत्या. मात्र, पोलिसांनी गायकवाड यांची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. यामुळे, कोणीतरी त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी अनिता एका पुरुषाला सोबत घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आल्या व निगडी पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, असे म्हणून आरडा-ओरडा करायला सुरवात केली.