कचऱ्यावरून सत्ताधाऱ्यांनीच तहकूब केली प्रभाग समितीची सभा

“ड’ प्रभागातील प्रकार; समस्या सुटेपर्यंत सभा न घेण्याचा नगरसेवकांचा निर्णय

पिंपरी  – शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी वाढत आहे. त्याचे पडसाद आज (शुक्रवारी) झालेल्या “ड’ प्रभाग समितीच्या सभेमध्ये उमटले. जोपर्यंत कचऱ्याची समस्या सुटणार नाही तोपर्यंत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनीच सभा तहकूब केली.

शहरातील कचऱ्याची समस्या गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र बनली आहे. ठिकठिकाणी कचरा साचत आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे कचरा सडत असून आरोग्याचे प्रश्‍नही निर्माण होऊ लागले आहेत. कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ही मागणी “ड’ प्रभागाच्या सभेतही करण्यात आली. या सभेमध्ये राहुल कलाटे, शत्रुघ्न काटे, तुषार कामठे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. “ड’ प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साठले आहेत, ठेकेदारकडून कचरा उचलला जात नसल्याचे आक्षेप घेण्यात आले. ज्या ठेकेदाराला काम दिले आहे, त्याने ठेका घेण्यापूर्वी कोणतीही तयारी न केल्याबद्दलही नाराजी व्यक्‍तकरण्यात आली. सर्वच नगरसेवकांनी कचऱ्याच्या समस्येवरून प्रशासनाला धारेवर धरत ही समस्या सुटेपर्यंत सभा तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला.

“ट्रायल’ घेणे गरजेचे होते – कलाटे

महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी कचरा योग्य पद्धतीने उचलला जात होता. नव्या ठेकेदाराला काम देताना जुन्या यंत्रणेसोबत ट्रायल घेणे गरजेचे होते. पूर्वीच्या गाडीमध्ये बाराशे घरांचा कचरा उचलला जात होता. नव्या यंत्रणेमध्ये एक गाडी केवळ 40 घरांचा कचरा उचलत असल्याने समस्या तीव्र बनली आहे. पालिका प्रशासनाने घेतलेला प्रत्येक निर्णय हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतो. कोणत्याही बाबींचा विचार न करता तसेच अनुभव नसताना कचरा उचलण्यासाठी राबविलेली यंत्रणाच कुचकामी ठरली आहे. यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न अधिकच गंभीर बनल्याचे मत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी व्यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)