सुरक्षा व्यवस्थेत वाढ; यात्रेकरूंना बारकोट स्लिप मिळणार
नवी दिल्ली – हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-कश्मिरातील अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. अमरनाथ यात्रेकरूंसाठी बारकोड स्लिप दिली जाणार असून यात्रेच्या मार्गावर 40 हजार जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
या वर्षी 1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होत असून 45 दिवसांपर्यंत ही यात्रा चालणार आहे. अमरनाथ यात्रा काळात जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांचा धोका आहे. दोन वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात आठ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.
तसेच पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी मोठी सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक यात्रेकरूला बारकोड स्लिप देण्यात येईल. त्यावर यात्रेकरूंचा क्रमांक असेल. या बारकोड स्लिपमुळे यात्रेकरूचे नाव, गाव, त्याचा फोटो, संपर्क क्रमांक, यात्रामार्ग याची माहिती प्रशासनाकडे राहील. यात्रेकरू, अमरनाथ बोर्ड आणि तपासणी यंत्रणा यांच्याकडे स्वतंत्र स्लिप असेल.
काश्मिरात 3880 मीटर उंचावर गुहेमध्ये अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. 1 जुलै ते 15 ऑगस्ट अशी 45 दिवस ही यात्रा चालणार आहे. वाहनांमधून यात्रेकरू येतात. वाहनाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चिप बसविली जाणार आहे.