अतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीचा फेरविचार करावा

पुणे – राज्यशासनाने आपल्याच लिखित कार्यपद्धतीचे उल्लंघन करून महापालिकेत तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी पुन्हा एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. ही बाब महापालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणारी असून सेवा नियमवालीप्रमाणे अतिरिक्‍त आयुक्तपदी पालिकेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत राज्यशासनाने पालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीची कार्यपद्धती निश्‍चित केलेली आहे. त्यात एका अतिरिक्‍तपदी पालिकेतील अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी, म्हणून पालिका अधिकाऱ्याची बढती होणे आवश्‍यक आहे, असे संघटनेने म्हटले आहे.  महापालिकेच्या अधिकाऱ्याला बढती देणे अपेक्षीत असलेले अतिरिक्त आयुक्तपद गेली चार वर्षे रिक्त आहे.

यापूर्वी या तिसऱ्या पदावर नरेंद्र झुरमुरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर या पदावर अतिरिक्त आयुक्त म्हणून राजेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. जगताप यांची नियुक्ती करताना, त्यांची पदस्थापना ही महापालिकेतील मुदत संपेपर्यंत असेल, त्यानंतर हे पद महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधून भरले जाईल, असे नमूद करण्यात आले होते. असे असतानाच; शासनाने महापालिका अधिकाऱ्यांना बढती तर दिलीच नाही शिवाय, आपल्या अधिकारात तिसऱ्या अतिरिक्‍त आयुक्तपदी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांची नियुक्तीही सेवा ज्येष्ठता असलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर अन्यायकारक असून त्यांचे खच्चीकरण करणारी आहे.

शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी महापालिकेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष उदय भट, जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

पालिका अधिकारी नाराज
शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पदासाठी सुमारे सात ते आठ अधिकारी पात्र होते. त्यांच्यातून एकाची पदोन्नतीने अतिरिक्‍त आयुक्तपदी नियुक्ती होणे अपेक्षित असतानाच शासनाने तीनही अधिकारी आपलेच नेमल्याने आम्ही आतापर्यंत पालिकेच्या केलेले सेवेचे हे अपमानास्पद फळ आम्हाला मिळणार का, असा सवाल हे अधिकारी उपस्थित करत आहेत. तर वारंवार अशा प्रकारे अन्याय होणार असेल तर आम्ही काम तरी कशासाठी करायचे, असा प्रश्‍न हे अधिकारी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे उपस्थित करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)