जशास तसे उत्तर द्यावेच लागेल ; शिवसेनेचा भाजपला इशारा

नगर: शिवसनेचे एक तत्व आहे, ती होऊन कोणाच्या वाटेला जात नाही. पण शिवसेनेच्या कोणी अंगावर आल्यास त्यांना शिंगावर घेण्याची ताकद नक्कीच आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर द्यावेच लागेल. अंगावर येतानाच विचार करून या, असा सज्जड दम नगर तालुका शिवसेनेने नगर तालुका भाजपच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पत्रकार परिषदेत दिला.

गेल्या काही दिवसांपासून भाजप लोकसभा उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ भाजप आणि शिवसेना महाआघाडीचे वेगवेगळे मेळावे नगर तालुक्‍यात झाले. त्या मेळाव्यात भाजपकडून शिवसेनाच्या माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यावर, तर शिवसेनेकडून भाजप आमदार कर्डिले यांच्यावर शाब्दीक हल्ले झाले. त्यामुळे तालुक्‍यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुका भाजपने पत्रकार परिषद घेत आमदार कर्डिले यांच्या वरील टीका सहन करणार नाही, अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा तालुका शिवसेनेला दिला. त्याला उत्तर म्हणून तालुका शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन भाजपलाही गंभीर इशारा दिला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, गोविंद मोकाटे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, पंचायत समिती सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे, प्रकाश कुलट आदी उपस्थित होते. कार्ले म्हणाले की नगर शहर आणि तालुक्‍यातील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांचा संयुक्त पहिला मेळावा हॉटेल संजोग आणि त्यानंतर बंधन लॉन या ठिकाणी पार पडला. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी आ. कर्डिलेंवर टीका केली नाही. विरोधी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्यावर खरे तर भाजपाने टीका करायला हवी होती. पण ते कामही शिवसेनेनेच केले. संग्राम जगताप यांच्यावर टीका केल्यानंतर त्याचा राग आ. कर्डिले किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना येण्याचे काही कारण नाही. पण तो त्यांना आला. साई आनंद लॉन येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार कर्डिले यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड आणि प्रा. गाडे यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली.

राम पानमळकर यांनी तर जावयांचा अपमान सहन करणार नाही, अशी भूमिका घेतली. आमदार कर्डिले यांनी या वादाला सुरूवात केली. त्यामुळेच आम्ही नक्षत्र लॉनच्या मेळाव्यात आमदार कर्डिलेंवर टीका केला. अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची आमची नेहमीच तयारी आहे, हे भाजपने लक्षात ठेवावे. आमदार कर्डिले यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे, हे काही खोटे नाही. त्यासाठी आजवरची अनेक उदाहरणे पुरेशी आहेत. आमदार कर्डिले यांचे कार्यकर्ते विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे काम करणार आणि करत आहेतच. आजच नगर तालुक्‍यातील संग्राम जगताप यांच्या दौऱ्यात बाजार समिती उपसभापती रेश्‍मा चोभे यांचे पती रेवणनाथ चोभे उघडपणे फिरत असल्याचा फोटो पुरावा म्हणून शिवसेनेने दाखवला. हेच रेवणनाथ चोभे सकाळी भाजपाच्या पत्रकार परिषदेला हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)