इच्छुकांच्या आकांक्षेला धुमारे

– बी. आर. चौधरी

उरुळी कांचन – शिरुर- हवेली लोकसभा मतदारसंघात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विधानसभेचा आखाडा तापण्यास सुरूवात झाली आहे. आता शिरूर- हवेली विधानसभा निवडणुकीसाठी हवेली तालुक्‍यातील राष्ट्रवादी, भाजप, वंचित बहुजन आघाडीतील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे हवेलीतून 38 गावे निर्णायक असल्यामुळे बंडखोरी भाजप किंवा राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. वंचित आघाडीचा टक्‍का यात लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

गेल्या तीन टर्ममध्ये कोमात गेलेली राष्ट्रवादी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जोमाने लढली. डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्ते झाडून कामाला लागले. त्यानंतर शिरूरच्या आखाड्यात परिवर्तनाची लाट आली. पंधरा वर्षांत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हवेलीने चांगलीच तोलामोलाची साथ दिली आहे. शिरूरमधील परिवर्तनानंतर शिरूर विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे भाजपचे कमळ उमळले असताना आमदार बाबूराव पाचर्णे यांनी 2014 मधील मोदी लाटेत एकतर्फी निवडणूक जिंकली. त्यामुळे हवेलीतील राष्ट्रवादी आणि भाजप, वंचित आघाडीच्या इच्छुकांच्या आकांक्षेला धुमारे फुटले आहेत.

विधानसभेचा आखाडा आता दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. शिरूर-हवेलीत विधानसभेचे वारे वाहत आहे. हवेलीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसे, वंचित आघाडी हे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बांधणी करीत आहेत. शिरुर – हवेलीतील नेत्यांची होणारी धावपळ अन्‌ विविध कार्यक्रमांत उपस्थितीसाठी नेत्यांची चढाओढ यामुळे मोर्चेबांधणी सुरु आहे. आमदारकीसाठी प्रत्येक पक्षातून अनेक नेते गुडग्याला बाशिंग बाधून आहेत. भाजपकडून शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे हे विकासकामांच्या जोरावर दोनदा आमदार झाले आहेत. तिसऱ्यांदा पाचर्णे हे प्रबळ दावेदार आहेत. भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव यांचेही नाव घेतले जात आहे. हवेलीचे भाजपचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे यांचेही नाव भाजपकडून रेसमध्ये आहे. शिरूर-हवेलीची आमदारकीची जागा मिळवण्यासाठी शिवसेना आक्रमक झाला आहे. यात शिवसेनेकडून मागील निवडणूक लढवून थोड्या मतांनी अपयशी ठरलेले शिवसेना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय सातव पाटीलही निवडणूक लढवण्याचा तयारीत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी विराजमान झालेले युवा नेते पै. ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली कटके प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

चौघांना आमदारकीचे डोहाळे…
शिरुर – हवेलीत राष्ट्रवादीकडून माजी आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्‍यात पंचायत समिती, बाजार समिती, स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. अनुभवी शिक्षित, कुशाग्र नेतृत्व म्हणून ऍड.माजी आमदार अशोक पवार यांचे नाव पुन्हा पुढे येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या पत्नी माजी सभापती व वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे या निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीकडे इच्छुक उमेदवार म्हणून महिलेला संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदलांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

उमेदवारांची चाचपणी
शिरुर – हवेलीतील नेत्यांची कार्यक्रमासाठी होणारी धावपळ अन्‌ उपस्थितीसाठी लागलेली चढाओढ आदी कारणामुळे शिरुर- हवेलीचा आमदार कोण, याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. शिरुर – हवेली तालुक्‍यात आमदारकीची हवा चढत असल्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. एकंदरीत मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. इच्छुकांनी गावागावांत जाऊन प्रचार सुरू केल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे. काही पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी होत असून मुलाखतीचा सिलसिला सुरू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)