लिबीयातील हिंसाचारामागे फ्रान्स असल्याचा आरोप

त्रिपोली – लिबीयाची राजधानी त्रिपोलीमध्ये शनिवारी शेकडो पिवळ्या डगलेवाल्यांनी लष्करी अधिकारी खलिफा हाफ्तार यांच्या कारवाईविरोधात जोरदार निदर्शने केली. हाफ्तार यांची लष्करी कारवाई फ्रान्सच्या पाठिंब्याने आणि चिथावणीने केली जात असल्याचा आरोपही या निदर्शकांनी केला.

फ्रान्समध्ये काही महिन्यांपूर्वी पिवळ्या डगलेवाल्यांनी देशभर आंदोलन उभे केले होते. तेंव्हापासून पिवळे डगले हे सरकारविरोधी आंदोलनाचे गणवेषधारी म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. त्रिपोलीच्या मध्यवर्ती चौकांमध्ये या पिवळे डगलेवाल्यांनी येऊन लिबीयात आंतरराष्ट्रीय मान्यतेनुसार स्थापन झालेल्या सरकारच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने केली.

लिबीयामध्ये फ्रान्सकडून अंतर्गत दुही माजवला जात आहे आणि या फुटिरवादी कारवाईबाबत लिबीयाच्या नागरिकांना आश्‍चर्य वाटत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि इजिप्त, सौदी अरेबिया यांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिमा निदर्शकांनी पायदळी तुडवल्या.

मोअम्मर गद्दाफीला 2011 मध्ये पायउतार आणि हत्या केल्यानंतर लिबीयामध्ये पाय रोवून बसलेल्या इस्लामी गटांचा हाफ्तार हे बचाव करत असल्याचे इजिप्त आणि संयुक्‍त अरब अमिरातीने म्हटले आहे. फ्रान्स लिबीयाचा मित्र असल्याचे भासवत आहे, मात्र प्रत्यक्ष्यात पडद्याआडून हिंसेला प्रोत्साहनच देत आहे. लिबीयातील अंतर्गत कारभारामध्ये अन्य देशांनी हस्तक्षेप करणे थांबवावे, असे “यलो व्हेस्ट’चळवळीतील काही प्राध्यापकांनी म्हटले आहे.
मात्र त्रिपोलीतील हिंसाचारात फ्रान्सचा काहीही हात नाही, असे फ्रान्सच्या दूतावासाठी अरेबिक भाषेत केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

लिबीयात हिंसाचार उसळल्यापासून आतापर्यत 200 जण ठार झाले आहेत. तर 900 जण जखमी झाले आहेत. तब्बल 25 हजार जणांना निर्वासित व्हावे लागले आहे, असे “इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर मायग्रेशन’ने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)