भाजपकडून राहुल गांधी आणि प्रियंकांवर भ्रष्टाचाराचे आरोप 

हरियाणातील जमिनीच्या खरेदीमध्ये झुकते माप 

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांचा सहभाग असलेल्या जमीन व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्यावतीने आज करण्यात आला. कॉंग्रेस पक्षाने मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून फेटाळले आहेत. हे आरोप म्हणजे बेरोजगारी आणि शेतीपुढील समस्यांकडून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी 2008 साली हरियाणात खरेदी केलेल्या या जमिनीच्या खरेदी व्यवहारामध्ये एच.एल पहावा यांचाही सहभाग होता. पहावा यांच्यावर “ईडी’ने छापा घातला होता. या प्रकरणातील महेश कुमार नागर हे रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित जमीन व्यवहारातही सहभागी होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा हवाला देऊन भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हे आरोप केले.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस असलेल्या त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी वढेरा यांना झुकते माप दिलेल्या या व्यवहाराबाबतचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. पहावा आणि गांधी यांच्यातील जमीन खरेदीसाठी सी.सी. थंपी यांनी अर्थसहाय्य केले असल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान स्पष्ट झाले होते. थंपी यांचीही चौकशी केली जात आहे. थंपी आणि रॉबर्ट वढेरा आणि वादग्रस्त शस्त्र व्यापारी संजय भंडारी यांची मैत्री सर्वश्रुत आहे, असेही इराणी यांनी सांगितले. “युपीए’ सरकारच्या काळात थंपी आणि भंडारी यांचा पेट्रोलियम आणि संरक्षण व्यवहारांशीही संबंध होता. केवळ रॉबर्ट वढेरा हेच नव्हे तर त्यांचे मेहुणे राहुल गांधी हे देखील कौटुंबिक भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला.

 भाजपने 5 वर्षात चौकशी का केली नाही ?

जर या जमीन व्यवहारामध्ये काही गैर होते, तर भाजपने गेल्या पाच वर्षात या व्यवहारांची चौकशी का केली नाही, असा प्रश्‍न कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्‍ते रणदीप सुर्जेवाला यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी 3 मार्च 2008 रोजी हरियाणातील पलवाल जिल्ह्यातल्या हसनपूर गावात 6.4 एकर जमीन 26 लाख 47 हजार रुपयांना खरेदी केली होती. त्यासाठी राहुल गांधी यांनी 4 लाख 10 हजार रुपये दराने धनादेशाद्वारे पैसे दिले. 26 जुलै 2012 रोजी राहुल गांधींनी ही 6.4 एकर जमीन प्रियांका गांधी यांना “गिफ्ट डीड’द्वारे दिली. त्यासाठी 1 लाख 93 हजार 700 रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले. प्रियांका गांधी यांनी 12 ऑगस्ट 2014 रोजी ही जमीन विपश्‍यना साधना संस्था या अध्यात्मिक संस्थेला भेट दिली. या संस्थेचा वरीलपैकी कोणाही व्यक्‍तीशी काहीही संबंध नाही, असे सुर्जेवाला यांनी सांगितले. 2019 च्या लोकसभा निवडणूकांमध्ये पराभव होणार हे स्पष्ट दिसायला लागल्याने आणि बेरोजगारी, शेतीपुढील समस्या, आर्थिक मंदी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अस्वस्थतेमुळे त्रस्त मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे संतुलन बिघडले आहे, अशी टीका सुर्जेवाला यांनी केली. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)