लखनौ – बसपच्या प्रमुख मायावती यांच्याप्रमाणेच सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आता भाजपप्रमाणेच कॉंग्रेसलाही निशाण्यावर घेण्यास सुरूवात केली आहे. सप-बसप महाआघाडीबाबत कॉंग्रेस पक्ष अफवा पसरवतोय, असा आरोप अखिलेश यांनी केला आहे.
सप इतर पक्षांना मदत करत आहे. तो पक्ष बसपबरोबर नाही, असे वक्तव्य अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तशाच अफवा कॉंग्रेसही पसरवत असल्याचे आमच्या ध्यानात आले आहे. सप-बसप महाआघाडी मजबूत असल्याचे मी प्रतिस्पर्ध्यांना सांगू इच्छितो. सप आणि बसपच्या कार्यकर्त्यांवर आमचा विश्वास आहे. त्यांनी अफवांकडे लक्ष न देता सतर्क रहावे, असे आवाहन अखिलेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
सप आणि बसप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी रालोदला बरोबर घेऊन उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी स्थापन केली आहे. त्या महाआघाडीपासून कॉंग्रेसला दूर ठेवण्यात आले. तसे असले तरी सुरूवातीला अखिलेश यांनी कॉंग्रेसबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र, अलिकडच्या काळात त्यांनी मायावती यांच्याप्रमाणेच कॉंग्रेसवरही शाब्दिक हल्लाबोल सुरू केला आहे.