धोक्‍याची घंटा सडावाघापूरचा “उलटा धबधबा’ देतोय

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची गरज
उमेश सुतार

कराड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कावळे साद पॉइंटवर दारूच्या नशेत खोल दरीत कोसळून आपल्या प्राणास मुकलेले युवक यासह विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळी सेल्फीच्या नादात जीव गमावलेले तरुणांच्या घटना अद्यापही डोळ्यासमोर तरळत असतानाच दुसरीकडे मात्र पाटण तालुक्‍यातील निसर्गाची देणगी लाभलेल्या सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी येणारे युवक आपला जीव धोक्‍यात घालून हुल्लडबाजी करीत सेल्फीची हौस पुरवताना दिसत आहेत. या पिकनिक स्पॉट पूर्णपणे असुरक्षित असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. याठिकाणी संभाव्य होणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावलावीत, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होवू लागली आहे.

चाफळच्या पश्‍चिमेस उंच डोंगर पठारावर सडावाघापूर हे गाव वसले आहे. या गावापासून काही अंतरावर सध्या पर्यटकांना खुणावणारा “उलटा धबधबा’ हे ठिकाण आहे. उंब्रज ते चाफळ मार्गे दाढोली वरुन या ठिकाणी जाण्यास डांबरी रस्त्याची सोय आहे. कास, ठोसेघर, कोयना पाठोपाठ हा उलटा धबधबा सुध्दा निसर्गप्रेमींचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सडावाघापूर येथे निसर्गाच्या मुक्तपणे होत असलेल्या उधळणीत असलेला हा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची दिवसेंदिवस मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीची चांगली सोय असल्याने येथे जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून येणारे पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, याठिकाणी केवल हुल्लडबाजी करण्यासाठी येणाऱ्या युवकांचीही संख्या लक्षणीय असल्याचे पहावयास मिळत आहे. उलट्या धबधब्यावर सेल्फी काढण्यासाठी तरुणाई अक्षरश: बेभान होत असून स्वत:चा जीव धोक्‍यात घालून सेल्फी घेताना दिसत आहेत.

हिरवाईने फुललेला हा परिसर अल्पावधीतच पर्यटकांना खुणावू लागला असला तरी पर्यटनासाठी येणाऱ्या हुल्लडबाज तरुणांचे या ठिकाणाला ग्रहण लागले आहे. ही तरुणाई दारूच्या नशेत गाडीतील गाण्यांवर सैराट होत आहे. बऱ्याचदा मद्यधुंद अवस्थेत जीव धोक्‍यात घालून कड्याजवळ धोकादायक स्थितीत ही मंडळी चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या डोक्‍यावर घेऊन नाचताना दिसून येत आहेत. यांना ना कुणाची भीती, ना कुणाचा अटकाव. त्यामुळे येथे हुल्लडबाज पर्यटकांच्या दंगामस्तीत वाढच होत आहे.

याचा त्रास इतर महिला पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ट्रिपल सीट फिरणे, बेभान होऊन गाड्या चालवणे अशा प्रकारात वाढ झाली आहे. असे प्रकार घडत असतानाही पोलीस यंत्रणेचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सेल्फीच्या नादानं बेभान झालेल्या तरुणाईवर नेमका आळा कोण घालणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
उलटा धबधबा हा वनविभागाच्या हद्दीमध्ये येत असल्याचे सडावाघापूर ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे. मात्र या धोकादायक उलट्या धबधब्याजवळ वन विभागाकडून सुरक्षितेचे कसलेच न केल्याने हे ठिकाण धोकादायक बनत चालले आहे. यासाठी वनविभागाने तातडीने याठिकाणी लोखंडी ग्रीलींग बसवून पर्यटकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी पर्यटकांमधून होत आहे.

सडावाघापूर येथील उलटा धबधबा हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने धबधब्याच्या परिसरात संरक्षक लोखंडी ग्रिलींग करण्यासाठीचा प्रस्ताव वनविभागामार्फत वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेला आहे. याला मंजुरी मिळताच येथे ठोस उपाययोजना करण्यात येतील.

विलास काळे वनक्षेत्रपाल, पाटण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)