फलक झाकण्याचे काम 100 टक्के झाल्याचा प्रशासनाचा दावा

फलकांवरील नावे झाकण्यात दुजाभाव
 
पुणे – नगरसेवक, पदाधिकारी राजकीय पक्षांचे फलक पूर्णपणे झाकल्याचा आणि ते काम 100 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असताना प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे, तर एकाच ठिकाणी शेजारी-शेजारी असलेल्या माजी नगरसेवकांच्या नामफलकाला स्टिकर लावले आणि विद्यमानांचे नाव मात्र तसेच झळकत ठेवल्याचा प्रकार सिंहगड रस्त्यावर घडला आहे.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता दि.10 मार्चपासून लागल्यानंतर दि.11 मार्चपासून महापालिकेने बॅनर, पोस्टर्स, नामफलकांवर कारवाईला सुरूवात केली. हे काम क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपवण्यात आले होते. क्षेत्रीय कार्यालयांनी काम पूर्ण झाल्याचा अहवालही दिला. परंतु काही ठिकाणी प्रशासन नावे झाकायला विसरल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. बहुतांश नगरसेवकांनी पक्षाच्या झेंड्याचा रंग या नामफलकांना लावला आहे. त्यातून सिंहगड रस्त्यावरील हा नामफलक दिसणार नाही, एवढा छोटाही नाही. असे असताना यावर स्टिकरिंग का केले गेले नाही, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. हे पाहता प्रशासनाने 100 टक्के काम पूर्ण केले आहे का? याविषयी शंका निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नगरसेवकांनीच अधिकाऱ्यांना चकवत “ट्रान्स्परन्ट स्टिकर’ लावले आहेत. त्याकडे अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले असून, “याने काय फरक पडतो’ अशी वृत्ती यामुळे निर्माण झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)