हजेरीत अनियमितता भोवणार

विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी : कनिष्ठ महाविद्यालये गोत्यात

पुणे – कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिकद्वारे घेण्यात येणाऱ्या हजेरीत अनियमितता आढळ्यास अथवा खोट्या नोंदी केल्यास, माहिती लपविल्यास संबंधित महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

शासनाने बायोमेट्रिकद्वारे अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याबाबतच्या निर्णय गेल्या वर्षी घेतला आहे. याची अंमलबजावणी सर्वच महाविद्यालयांनी करणे गरजेचे आहे. हजेरीच्या नोंदीही महाविद्यालयाने ठेवणे गरजेचे आहे. विशेष पथकामार्फत महाविद्यालयांची अचानक तपासणीही सुरू करण्यात आलेली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी महाविद्यालये आहेत. यातील ठराविक व संशयास्पद महाविद्यालयांना तपासणी पथक भेट देत आहे.

बहुसंख्य महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थित नसणे, प्रवेश एका ठिकाणी घ्यायचा व प्रत्यक्षात इतरत्र बसायचे अशा विद्यार्थ्यांची खोटी उपस्थितीची नोंद ठेवणे, बायोमेट्रिक मशीन शाळेऐवजी इतरत्र लावणे, महाविद्यालयाच्या इमारतीत खासगी क्‍लासेस चालविणे, खासगी क्‍लासेस सोबत टायअय करार करणे, विद्यार्थी उपस्थितीसाठी आवश्‍यक बायोमेट्रिक यंत्रसामग्री उपलब्ध केलेली नसणे आदी विविध प्रकार घडत असल्याचे उघडकीस येऊ लागले आहेत. त्यामुळे ही तपासणी होत आहे.

खोट्या नोंदी पट पडताळणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात, असे आदेश जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना बजाविले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)