मेडिकल कॉलेजच्या घोषणेबरोबरच रंगला श्रेयवाद 

सातारा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा आणि राजकीय हेवेदाव्यांमध्ये अडकलेला सातारा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न सार्वजनिक आरोग्य विभागाने अखेर मार्गी लावला. मेडिकल कॉलेजसाठी सातारा जिल्हा रुग्णालय करार तत्त्वावर हस्तांतरित करण्याचे अध्यादेश जाहीर झाल्यानंतर सातारा शहरातील दोन सत्ताकेंद्रांमध्ये श्रेयवादाची स्पर्धा तीव्र झाली. खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरवरुन आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची या निवासस्थावरुन मेडिकल कॉलेज झाले ते आमच्यामुळेच असे परस्पर विरोधी दावे करणारे दोन खुलासे प्रसारमाध्यमांकडे रवाना झाले. आणि पुन्हा श्रेयवादाच्या चर्चेला साताऱ्यात निमित्त मिळाले.

सातारा जिल्हा रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण व द्रव्य औषधी विभागाला हस्तांतरित झाले आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा महत्वाचा टप्पा पार पडला. ही जटील प्रक्रिया जिल्हावासीयांच्या जनइच्छेनुसार घडली आहे, याचे समाधान आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पाचशे खाटांच्या रुग्णालयाच्या निकषांची पूर्तता साताऱ्यात होत आहे.

शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव जागेअभावी प्रलंबित होता. आधी खावलीचा पर्याय शोधला गेला. मात्र, कृष्णानगर येथे पाटबंधारे विभागाची जागा निश्‍चित झाल्याने जिल्हा रुग्णालय हस्तांतरण प्रक्रियेमुळे एक पाऊल पुढे टाकले गेले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आम्ही सातत्याने तगादा लावला होता.

साताऱ्यात वैद्यकीय शिक्षणाच्या नवीन संधी निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न सुरू होते. म्हणूनच सातारा जिल्हा रुग्णालय करार तत्वावर हस्तांतरण करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने परवानगी दिली. डीन म्हणून डॉ. मुरलीधर तांबे व नोडल ऑफिसर म्हणून डॉ. प्रकाश गुरव व आवश्‍यक स्टाफ प्रतिनिक्‍युतीने घेण्याचे आदेश आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, डीन डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. प्रकाश गुरव, वर्ग 1 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजोग कदम यांचे या प्रक्रियेत मोलाचा सहभाग असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

जिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू करण्याची पदनिर्मितीसह मागणी केली होती. त्यासाठी जिल्हा रुग्णालय हस्तांतरणाचा आदेश राज्य शासनाने काढला असून मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागला आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. मेडिकल कॉलेजचे घोंगडे जागा हस्तांतरण व इमारत बांधकामाच्या विलंबामुळे भिजत पडले होते. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण मागणी करून हा प्रश्‍न निकाली काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या महिन्यात कराड दौऱ्यावर आले असताना शिवेंद्रराजे यांनी मेडिकल कॉलेज तातडीने या इमारतीत सुरू करावे, अशी आग्रही मागणी केली होती. जेणेकरून पदनिर्मितीसह प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू होऊन मुलांच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा पाठपुरावा शिवेंद्रराजे यांनी केला होता.

सार्वजनिक आरोग्य विभागाने 15 जुलै रोजी अध्यादेश काढून जिल्हा रुग्णालयाचे हस्तांतरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तीनशे खाटांचे रुग्णालय अद्ययावत सुविधांसह सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवेंद्र राजे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पुणे व मुंबईवर अवलंबून राहणाऱ्या सातारा जिल्हयातील विद्यार्थ्यांची परवड थांबणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवेंद्रराजे यांनी आभार मानले असून सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजचे पहिले डीन होण्याचा मान डॉ. मुरलीधर तांबे यांना मिळाला आहे. याशिवाय प्राध्यापक, सहप्राध्यापक व तज्ज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)