‘थॅलेसिमिया मेजर’ आजाराची माहिती आणि उपाय

-डाॅ.चैतन्य जोशी 

आपल्या आजूबाजूला आज अनेकजण विविध कारणांमुळे निरनिराळ्या आजारांनी त्रस्त आहेत. हृदयविकार, कॅन्सर, डायबेटीस, संधिवात आदी अनेक आजारांचा त्यात समावेश आहे. योग्य औषधोपचार आणि योग्य जीवनशैली आचारल्यास हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा ते नियंत्रित राहू शकतात, पण थॅलेसिमिया मेजर हा एकमेव आजार असा आहे की तो कधीही बरा न होणारा आजार आहे. त्यामुळे या आजाराबद्दल गांभीर्याने विचार करण्याची खरी गरज आहे.

थॅलेसिमिया मेजर हा आजार जन्मत:च बाळामध्ये आढळून येतो. भारतामध्ये आजमितीस अंदाजे 3 लाख रुग्ण या आजाराचे असून दरवर्षी 10 हजार मुले या आजाराची जन्माला येत आहेत. थॅलेसिमिया हा एक अनुवंशिक रक्ताचा आजार आहे. या आजाराचे रुग्ण, थॅलेसिमिया मायनर व थॅलेसिमिया मेजर या दोन प्रकारांत विभागलेले आहेत.

थॅलेसिमिया मेजर आजार झालेल्या बाळाच्या शरीरात जन्मापासूनच रक्त तयार होत नाही. त्याच्या शरीरात हिमोग्लोबीन तयार करणाऱ्या दोन्ही जिन्स खराब असतात. त्यामुळे सशक्त लाल पेशी तयार होत नाहीत. त्या लवकर फुटून शरीरात नेहमी हिमोग्लोबीनची कमतरता आढळून येते. शरीरात रक्त तयार होत नसल्यामुळे जन्मभर रक्त बाहेरून द्यावे लागते. सुरुवातीला 60 दिवसांनंतर 1 बाटली व नंतर आठवड्यातून दोन बाटल्या रक्त द्यावे लागते. दर महिन्याला त्यासाठी कमीत कमी 10 हजार रुपये खर्च आहे.

-Ads-

बाहेरून रक्त दिल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोहकण साचतात आणि हे अधिकचे लोह शरीरातून काढण्यासाठी गोळ्या वा इंजेक्‍शने घ्यावी लागतात. थॅलेसिमिया मेजर आजार झालेल्या व्यक्तीचे आयुष्य साधारणपणे 20 वर्षांपर्यंतच असते. रुग्णांसाठी बाहेरून दिले जाणारे रक्त, इंजेक्‍शने व गोळ्या यासाठी दरवर्षी या आजारावर मोठा खर्च होतो.

त्याशिवाय रुग्ण व त्याच्या परिवाराला होणारा शारीरिक व मानसिक त्रास वेगळाच असून त्याची मोजदाद पैशात करता येणारी नाही. आपला परिवार व आपला समाज यांना या गंभीर रोगापासून मुक्त करण्यासाठी थॅलेसिमिया मेजर आजाराचे बाळ जन्मालाच येऊ नये हा एकमेव रामबाण उपाय आपल्या हाती आहे.

त्यासाठी लग्न करण्यापूर्वी तरुण-तरुणींनी व नवविवाहित तरुण-तरुणींनी थॅलेसिमिया मायनरची टेस्ट करून घेणे आवश्‍यक ठरेल. थॅलेसिमिया मायनर हा रोग नाही. तो रक्तातला थोडा दोष आहे. त्यामुळे घाबरण्याची आवश्‍यकता नाही. ज्या बाळाचे आई-वडील दोघेही थॅलेसिमिया मायनर असतील तर त्या बाळाला थॅलेसिमिया मेजर आजार होऊ शकतो ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे.

लग्नापूर्वी तरुण-तरुणींनी टेस्ट करून घेतल्यावर दोघेही थॅलेसिमिया मायनर आढळल्यास त्यांनी लग्न करण्याचे टाळणे हिताचे होईल. जोडीदारापैकी एक मायनर असल्यास कोणतीही भीती नाही. त्यामुळे थॅलेसिमिया बाळ जन्माला येणार नाही.

आई व वडील दोन्ही थॅलेसिमिया मायनर आढळल्यास पुढील बाळासाठी गर्भावस्थेत 10 ते 12 व्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये तपासणी करावी लागते. थॅलेसिमिया मेजर बाळ जन्माला येणार असेल तर गर्भपात करणे शक्‍य होईल. थॅलेसिमिया मेजर हा रोग अती गंभीर असून त्या आजाराचे बाळ जन्मालाच येऊ नये, यासाठी दक्ष राहणे आवश्‍यक ठरेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)