थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू, प्रणय, कश्‍यप यांची विजयी सलामी!

sindhu with pranay

बॅंकॉक:  भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू, तसेच गुणवान पुरुष खेळाडू एच. एस. प्रणय व पारुपल्ली कश्‍यप यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र आठवा मानांकित समीर वर्मा आणि युवा महिला खेळाडू वैष्णवी रेड्डी यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने बल्गेरियाच्या लिंडा झेटचिरीचा 21-8, 21-15 असा केवळ 26 मिनिटांत पराभव करीत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. सिंधूसमोर आता यिप पुई यिन आणि ली चिया हसिन यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे. मात्र जपानच्या आठव्या मानांकित सायाका सातोने वैष्णवी रेड्डीचे आव्हान 21-13, 21-17 असे 21 मिनिटांत संपुष्टात आणले.

पुरुष एकेरीत चतुर्थ मानांकित प्रणयने स्पेनच्या पाब्लो ऍबियनचा प्रतिकार 21-16, 21-19 असे 35 मिनिटांत मोडून काढला. दुसऱ्या फेरीत प्रणयला इंडोनेशियाच्या सोनी द्वि कुंकोरोशी झुंज द्यावी लागेल. तसेच बिगरमानांकित कश्‍यपने कॅनडाच्या जेसन अँथनीचा 21-15, 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव करीत आगेकूच केली. दुसऱ्या फेरीत कश्‍यपची गाठ जपानच्या कॅन्टा सुनेयामाशी पडणार आहे.

दरम्यान भारताच्या राष्ट्रीय विजेत्या व आठव्या मानांकित समीर वर्माला थायलंडच्या बिगरमानांकित तानोंगसाक सेनसोम्बुन्सुकविरुद्ध 18-21, 16-21 असा 44 मिनिटांच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. तसेच मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोडीला मा ही चुन आणि येउन्ग एन्गा तिंग या हॉंगकॉंगच्या जोडीकडून 19-21, 15-21 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)