बॅंकॉक: भारताची जागतिक स्पर्धेतील रौप्यविजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने मलेशियाच्या सोनिया चीहचे आव्हान सरळ गेममद्ये मोडून काढताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतील उपान्त्य फेरीत धडक मारली. द्वितीय मानांकित सिंधूने सोनियाचा 21-17, 21-13 असा केवळ 36 मिनिटांत पराभव करीत अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

सिंधूने त्याआधी पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या लिंडा झेटचिरीचा एकतर्फी पराभव केला. होता. तसेच दुसऱ्या फेरीत हॉंगकॉंगच्या बिगरमानांकित यिप पुई यिन हिच्यावर सरळ गेममध्ये मात करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी सिंधूसमोर इंडोनेशियाच्या बिगरमानांकित ग्रेगोरिया मेरिस्काचे आव्हान आहे.

आणखी एका उपान्त्यपूर्व सामन्यात मेरिस्काने जपानच्या बिगरमानांकित साएना कावाकामीचे आव्हान 21-18, 21-12 असे संपुष्टात आणताना उपान्त्य फेरीत धडक मारली. महिला एकेरीच्या दुसऱ्या उपान्त्य लढतीत जपानच्या चतुर्थ मानांकित नोझोमी ओकुहाराला मलेशियाच्या सातव्या मानांकित झांग बेईवानशी झुंज द्यावी लागेल.

नोझोमी ओकुहाराने उपान्त्यपूर्व लढतीत जपानच्याच आया ओहोरीचा प्रखर प्रतिकार 21-12, 15-21, 21-19 असा संपुष्टात आणताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. तर झांग बेईवानने अग्रमानांकित आकाने यामागुचीला 14-21, 21-19, 21-19 असे चकित करताना या स्पर्धेतील सर्वाधिक खळबळजनक निकालाची नोंद केली.

तत्पूर्वी भारताच्या चतुर्थ मानांकित एच. एस. प्रणय व पारुपल्ली कश्‍यप यांचे पुरुष एकेरीतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. तसेच मिश्र दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी आणि सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोड्यांना, तर पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीत रेड्डी या भारतीय जोडीला, तसेच एकेरीत आठवा मानांकित समीर वर्मा आणि युवा महिला खेळाडू वैष्णवी रेड्डी यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)