पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांना वितरित : डिबीटीचा बोजवारा उडाला
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकाचे शाळा सुरू होण्याच्या दिवशी वाटप केले जाणार असून तालुक्यातील प्रत्येक शाळेत पुस्तके पाठविण्यात आली आहेत. याबरोबरच तालुक्यात यावर्षी सगळ्यांना शालेय गणवेश दिला जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी दिली.
गेल्यावर्षी डीबीटी योजनेचा बोजवारा उडून शिक्षकांबरोबरच पालकांना मनस्ताप झाला होता. शालेय विद्यार्थ्यांना एकच रंगाचा ड्रेस कोड न मिळाल्याने रंगीत संगित शालेय गणवेश दिसू लागले होते. त्यामुळे गणवेशाबाबत सर्वत्र ओरड सुरु झाली होती. त्याची शिक्षण विभागाने दखल घेत शालेय विद्यार्थी पटसंख्येनुसार 600 रुपयाप्रमाणे एकत्रित निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे या आठवड्यात वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर आणि स्वस्त दराने शालेय गणवेश उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे. यंदा जिल्हा परिषदेने कोवळ्या वयात बालमनावर गणवेशावरुन होणारी विषमता दूर करुन सर्वच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तेही एक सारखे मिळावे म्हणून जिल्हा परिषद निधीची तरतूद केली आहे.
शालेय व्यवस्थापन समितीला शाळेचा गणवेश खरेदी करण्याचे जरी अधिकार दिले असले तरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शालेय विद्यार्थ्यांचा एकच रंगाचा शालेय ड्रेस कोड असावा, असा ठराव खेड पंचायत समितीच्या मासिक मिटींगमध्ये घेण्यात आला, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर यांनी दिली.
खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील 32 हजार 450 एकूण विद्यार्थ्यापैकी 21 हजार 840 विद्यार्थ्यांसाठी गेल्या शैक्षणिक वर्षात दोन ड्रेस खरेदीसाठी 600 रुपयाप्रमाणे डिबीटीनुसार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले होते. तर उर्वरित 11 हजार विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक वर्षात शालेय गणवेश देण्याचा निर्णय घेऊन निधीची तरतूद करुन निधी पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आहे.
– संजय नाईकडे, गटशिक्षण अधिकारी, खेड.
शाळा सुरू होण्यापूर्वीच तालुक्यातील 35 केंद्र शाळावर शालेय पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. 1 ते 8 वी पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक मिळून 465 शाळा आहेत. सर्वसाधारण 45 हजार 520 विद्यार्थी संख्याचे अंदाज ठेवून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचे स्वागत करण्याच्या तयारीसाठी शालेय स्तरावर उपक्रमाचे आयोजन शिक्षकांनी केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप सरपंचांच्या हस्ते होणार आहे.
– जीवन कोकडे, विस्तार अधिकारी.