ऐतिहासिक कसोटीला आज प्रारंभ “टीम इंडिया’ समोर इंग्लंडचे कडवे आव्हान…  

बर्मिंगहॅम: भारत विरुद्ध इंग्लंड या बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून (बुधवार) बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडसाठी हा महत्त्वाचा सामना असून या सामन्याद्वारे इंग्लंडचा संघ आपल्या एक हजार कसोटी सामन्यांची पूर्तता करणार आहे. तर भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडमधील आपली अपयशी मालिका खंडित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. इंग्लंडने अंतिम 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून अनुभवी मोईन अलीला वगळून अदिल रशीदचा समावेश केला आहे.
पहिली कसोटी जिंकून भारतीय संघ या मालिकेची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक आहे. सध्या इंग्लंडमध्ये कडक उन्हाळा असून हे वातावरण स्विंग गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना अधिक फायदेशीर असल्याने या सामन्यात भारतीय संघ किती स्पिनर्स घेऊन उतरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच कुलदीप यादवचा अंतिम 11 खेळाडूंत समावेश केल्यास जडेजा किंवा अश्‍विन यापैकी एकाला वगळावे लागेल.
याआधी 2011 मधील कसोटी मालिकेत भारताला तब्बल 0-4 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर 2014 च्या दौऱ्यात भारताला केवळ एकच कसोटी सामना जिंकता आला होता. त्यावेळीही भारत 1-3 अशा फरकाने पराभूत झाला होता. भारतीय संघाने अखेरची कसोटी मालिका राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली 2007 साली जिंकली होती. त्यानंतर मात्र भारताला सारखेच पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
रविवार आणि सोमवारी दिवशी बर्मिंगहॅम येथे पाऊस झाल्याने हे वातावरण इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी पोषक आहे. पावसामुळे खेळपट्टी स्विंग गोलंदाजांना अनुकूल असेल. त्यामुळे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या गोलंदाजीसाठी हे पोषक वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच भारतीय संघाला पावसामुळे सराव करायला मिळला नसल्याची बाब पुढे आली आहे. कारण गेले काही दिवस बर्मिंगहॅममध्ये पाऊस पडत असल्यामुळे संघाच्या सरावावर पाणी पडले आहे.
शमीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह 
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचे तीन धक्‍के बसले आहेत. पण आता त्यांना चौथा धक्‍काही बसू शकतो. कारण भारताच्या एका माजी गोलंदाजाने संघातील वेगवान गोलंदाज महंमद शमीच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शमीला यापूर्वी गुडघ्याची दुखापत झाली होती. या दुखापतीतून शमी अजून सावरलेला दिसत नसल्याचे भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने म्हटले आहे. शमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, यावर विश्‍वास ठेवणे कठीण असल्याचे सांगून नेहरा म्हणाला की, गेल्या सहा महिन्यांमध्ये महंमद शमी कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली दिसत नाही. त्यामुळे शमीला अन्य गोलंदाजांसारखे दीर्घ स्पेल टाकता येणार नाही. त्यामुळे कर्णधार कोहलीने त्याच्या गोलंदाजीचा वापर करताना विचार करायला हवा.
भारतीय फलंदाजांसमोर आव्हान 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना एजबॅस्टन मैदानावर रंगणार आहे. आतापर्यंत या मैदानात भारताला एकदाही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळेच हा सामना जिंकणे भारतासाठी सोपे नाही. भारताने हा सामना जिंकला तर तो विजय ऐतिहासिक ठरेल. आतापर्यंत या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सहा कसोटी सामने झाले आहेत. या सहापैकी एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. या सहापैकी इंग्लंडने पाच सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे या मैदानात भारताच्या पराभवाची टक्‍केवारी 83 टक्‍के आहे. या मैदानात एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताकडून या मैदानात सर्वाधिक धावा आहेत त्या माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये गावस्कर यांनी 216 धावा केल्या असून या मैदानात गावस्कर यांनाच दोनशेपेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. या मैदानात भारताचा पहिला कसोटी सामना 1967 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 132 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर या मैदानात भारताचा अखेरचा कसोटी सामना 2011 साली खेळवला गेला होता. या सामन्यात भारताला एक डाव आणि 242 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे होते. त्याचबरोबर संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे दिग्गज फलंदाज होते. इंग्लंडने या सामन्यातील पहिला डाव 710 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर भारताचे दोन्ही डाव अमुक्रमे 224 आणि 244 धावांवर आटोपले होते.
प्रतिस्पर्धी संघ – 
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह व शार्दूल ठाकूर.
इंग्लंड – ऍलिस्टर कूक, कीटन जेनिंग्ज, जो रूट (कर्णधार), डेव्हिड मेलन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन स्टोक्‍स, जोस बटलर, अदिल रशीद, सॅम करन, स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन
सामन्याची वेळ- दुपारी 3-30 पासून.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)