दहशतवाद : शब्द, व्याख्या आणि वादविवाद

मुळात दहशतवादाच्या हजारो व्याख्या तयार होवु शकतात त्याला ठरावीक शब्दांमध्ये बंदिस्त करणे अवघड आहे. दहशतवाद म्हणजे “दहशत’ आणि त्यातुन घडवले जाणारे “वाद’. म्हणजेच विशिष्ट विचारसरणीच्या अतिरेकी वापरातुन सर्वसाधारण समाजावर समूहिक, वैचारीक-शस्त्रास्त्र अथवा उपद्रवी दहशत निर्माण करणे. यात केवळ बॉम्बहल्ले, शस्त्रहल्ले, जमावाकडून उद्रेकी हल्ले एवढेच येत नाही तर एका विशिष्ट विचारसरणीच्या कट्टरतावादातुन धार्मिक तणाव निर्माण करणे, संस्कृती-रुढी-परंपरांच्या नावाखाली स्वतःचा अजेंडा चुकीच्या पद्धतीने राबविणे, आर्थिक अथवा सत्तेचा वापर करुन असंविधानीक पिळवणुक करणे यालाही “दहशतवाद’ संबोधणे चुकीचे ठरणार नाही.

आपल्याकडे सहसा दहशतवादी म्हंटले की त्याला दाढीच हवी, तो एका विशिष्ट धर्माचा असतो, त्याच्याकडे बंदुक-बॉम्ब असावेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु दहशतवादी या शब्दाकडे व्यक्ती म्हणुन न पाहता ती एक प्रवृत्ती म्हणुन पाहिले गेले पाहिजे. सुरळीत समाजव्यवस्थेत काहीतरी अघटीत घडवायचे आणि समाजस्वास्थ्य बिघडवायचे या हेतुन प्रेरित असणारी व्यक्ती अथवा व्यक्तीसमुह म्हणजे सर्वसाधारणपणे दहशतवादी समजावे. आता यात असा अजुन एक गैरसमज आहे तो म्हणजे दहशतवादी म्हणजे बाहेरच्या देशातील व्यक्तीकडुन आपल्या देशात घुसुन अघटीत घडवले जाते. पण त्याच्या उपद्रवाचा जो हेतु आहे तोच देशांतर्गतही आढळुन येतो. बाहेरच्या व्यक्तीने आपल्या दैशात येवुन हल्ला केला तर तो दहशतवादी आणि देशातीलच व्यक्तीने असा हल्ला केला तर तो दहशतवादी ठरणार नसेल तर आपण व्याख्येचा विचार करताना चुकतोय असे समजावे.

समजा पाकिस्तानातुन एखादी व्यक्ती भारतात घुसली आणि तीने भारतातील दहा नागरिक गोळ्या घालुन मारले तर तो दहशतवादी ठरतो परंतु भारतातीलच व्यक्तीसमुहाने एखादे हत्याकांड घडवले तर ते दहशतवादी नसुन “गुन्हेगार’ ठरतात. संतोष माने नावाच्या ईसमाने एसटी बसखाली चिरडुन निष्पापांना मारले तर तो “आरोपी” असतो. धार्मिक दंगली, सामुहीक हत्याकांड, सुडभावनेने केलेली जहरी कृत्ये सर्व दहशतवादातच मोडले जावे. मग त्यात गोध्रा हत्याकांड असो, विचारवंतांच्या निर्घुण हत्या असोत, अथवा मॉब लिंचींगच्या घटना असोत. या सर्वांचा थेट संबंध दहशतवादाशी जोडता आलाच पाहीजे. दहशतवाद ही व्यापक संकल्पना आहे आणि ती धार्मिकदृष्ट्यासुद्धा लागु पडते. कोणत्याही एका जाती-धर्माबद्दल मर्यादीत न ठेवता, ज्या ठिकाणी धार्मिक कट्टरतावादातुन दहशतवादसदृश्‍य घटना घडत असतील तर त्या “धार्मिक दहशतवादातच’ मोडतात. कोणताही कट्टरतावाद आणि त्यातुन घडणाऱ्या चुकीच्या घटना याला दहशतवाद म्हणायला काहीच हरकत नसावी.

– निखिल घाडगे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)