श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदिपोरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर बंदची हाक देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच नागरिक रस्त्यावर उतरले असून परिसरातील शाळा आणि दुकाने बंद करण्यात आली आहेत. या आंदोलनांमुळे तणाव असून आंदोलकांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दगडफेकीत 47 जवान जखमी
काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांवर सोमवारी (दि.13) स्थानिक आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा तुफान दगडफेक केली. दगडफेकीद्वारे करण्यात आलेला हा हल्ला इतका भीषण होता की, या घटनेत तब्बल 47 जवान जखमी झाले आहेत. यामध्ये एका सहाय्यक कमांडंटच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. काश्मीर खोऱ्यातील आंदोलनकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या बारामुल्ला जिल्ह्यातील मीरगुंड, चैनाबाल, हार्थरथ, सिंहपोरा, झील ब्रीज, कृपालपोरा आणि हांजीवेरा येथे सैन्याच्या जवानांवर तुफान दगडफेक केली. याला जवानांनीही प्रत्युत्तर दिले या प्रतिकारात 7 दगडफेक करणारे लोक जखमी झाले आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनामुळे वाहतूक सेवेलाही फटका बसला आहे. मात्र सरकारी कार्यालये आणि बॅंका नेहमीप्रमाणे सुरु होत्या. बंदिपोरा जिल्ह्यात 9 मे रोजी तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक गठीत केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
चिमुरडीवर झालेल्या बलात्काराचा निषेध करत काश्मीर खोऱ्यात बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, राजकीय पक्ष आणि फुटीरवादी संघटनांनीदेखील बलात्काराचा निषेध करत आरोपीला कडक शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार, इफ्तारच्या काही वेळ आधी मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपीने मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवून अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. मुलगी जवळच्या परिसरात आढळली होती, असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी ताहीर अहमद मीर या आरोपीला अटक केली आहे. पण जेव्हा स्थानिक शाळेने आरोपीच्या जन्म दाखल्यावर फेरफार करत त्याला अल्पवयीन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.