पुणे- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून झाडीमध्ये नेवून तिच्यावर बलात्कार करणायाला 10 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
सतीश सुनील वाघ (वय 19, रा. वारजे) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. संबंधित मुलगी ही 29 मे 2015 रोजी रात्री आठच्या सुमारास एका चाळीतील नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी सतीशने तिचे तोंड दाबून तिला जवळच्या झाडीमध्ये नेले. त्यानंतर तिला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. मुलगी घरी आली नाही म्हणून आईवडील तिचा शोध घेत घटनेच्या ठिकाणी पोचले. त्यामुळे कोणीतरी येत असल्याचे पाहत सतीशने तेथून पळ काढला होता.
हा सर्व प्रकार मुलीने फिर्यादी यांना सांगितल्यानंतर सतीश विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील भारती कदम यांनी पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.