#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग २) 

जोसेफ तुस्कानो (ज्येष्ठ विज्ञानलेखक) 
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्‍यक असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच यासाठी मोठे योगदान देऊ शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाहतुकीपासून संरक्षणापर्यंत आणि इलेक्‍ट्रॉनिकपासून उपग्रह प्रक्षेपणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांनी मौलिक संशोधन केले आहे. स्वातंत्र्याची 71 वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिल्यास असे दिसते की शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम आणि त्यांना सरकारचा भरभरून मिळालेला पाठिंबा यामुळेच विज्ञानक्षेत्रात चौफेर प्रगती झाली आहे. आज तंत्रसमृद्ध देशांच्या यादीत भारत अभिमानाने उभा आहे, तो या शास्त्रज्ञांमुळेच! 
देशातील परिवहनाच्या क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञानाचे कायम स्वागत होत राहिले आणि ग्रामीण भागापर्यंत त्याचा लाभ पोहोचला. पूर्वी ज्या प्रवासासाठी काही महिने लागत असत, तो प्रवास आज अवघ्या काही तासांत पूर्ण होतो. संशोधन आणि विकास योग्य वेगाने झाल्यामुळेच हे शक्‍य झाले. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक अशा चारही क्षेत्रांमध्ये देशात सातत्याने प्रगती होत राहिली आहे. तथापि, जगातील प्रमुख विकसित देशांच्या पंक्तीत बसण्यासाठी वाहतूक क्षेत्रात भारतात अजून बऱ्याच सुधारणा होणे आवश्‍यक आहे.
वैज्ञानिक विश्‍वाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा अनेक प्रयोग आणि संशोधने अशी आहेत, ज्यात अनेक देशांच्या संशोधकांनी एकाच वेळी सहभाग घेतला. असेही काही प्रयोग आणि संशोधने आहेत, ज्यावर प्रत्येक देशात वेगवेगळ्या स्तरांवर काम सुरू असल्याचे दिसते. अगदी संगणकाचे उदाहरण घेतले तरी हा शोध कोणत्याही एका संशोधकाने किंवा एकट्या देशाने लावलेला नाही. या संशोधनावर अनेक देशांमध्ये एकाच वेळी काम सुरू होते. आज ज्या स्वरूपात संगणक आपल्या समोर आहे, तो विविध देशांतील संशोधकांनी स्वतंत्ररीत्या केलेल्या संशोधनाचा एकत्रित परिणाम आहे.
संगणकाच्या क्षेत्रात भारतातही बरेच संशोधनकार्य झाले आहे. संगणक ही एक क्रांती असून, शिक्षण, कृषी, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत संगणकाने मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले आहेत. या संशोधनामुळे प्रत्येक क्षेत्रात नवनवीन सुविधा विकसित झाल्या आहेत. क्षणार्धात माहितीची आदानप्रदान जगाच्या कोणत्याही टोकाला केली जाऊ शकते. आजही या क्षेत्रात संशोधन सुरूच असून, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, इन्टरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबोटिक्‍स या विषयांमध्ये होऊ घातलेले बदल संपूर्ण जगाला बदलून टाकणारे आहेत.
भारतातील सॉफ्टवेअर अभियंते जगभरात हुशार अभियंते म्हणून ओळखले जातात. आरोग्याच्या क्षेत्रात कॅट स्कॅनर, संरक्षणाच्या क्षेत्रात क्षेपणास्त्रे, रडार आणि अण्वस्त्रे, दूरसंचाराच्या क्षेत्रात उपग्रह, परिवहनाच्या क्षेत्रात चालकविरहित वाहने, विमाने, कृषी क्षेत्रात रासायनिक खते आणि शेती उपकरणे या सर्वच गोष्टींचा विकास जगभरात एकाच वेळी झालेला आहे. कोणत्याही एका देशाने ही क्रांती घडविलेली नाही. या सर्वच क्षेत्रांत भारतीय संशोधक सहभागी झाले. भारत आता केवळ दुसऱ्या देशांकडून तंत्रज्ञान आयात करणारा देश उरलेला नाही तर तंत्रज्ञान विकसित करण्यात मौलिक योगदानही देत आहे.
भारतातील प्रमुख संशोधकांमध्ये होमी भाभा, जगदीशचंद्र बोस, सी. व्ही. रमण, शांतिस्वरूप भटनागर, एम. एन. साहा, प्रफुल्लचंद्र राय, हरगोविंद खुराना या नावांचा अग्रक्रमाने समावेश होतो. जगदीशचंद्र बोस यांनी साधनसामग्रीची उपलब्धता नसतानाही आपले संशोधनकार्य सुरू ठेवले होते. रेडिओ लघुलहरींचा शोध त्यांनी लावला. विद्युतचुंबकीय लहरींचा प्रयोग त्यांनी मारकोनी यांच्या आधी केला होता. तसेच रोपांमध्ये जीवनाच्या लक्षणांचा शोधही त्यांनी घेतला. सी. व्ही. रमण हे एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)