स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग १) 

जोसेफ तुस्कानो (ज्येष्ठ विज्ञानलेखक) 
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्‍यक असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच यासाठी मोठे योगदान देऊ शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाहतुकीपासून संरक्षणापर्यंत आणि इलेक्‍ट्रॉनिकपासून उपग्रह प्रक्षेपणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांनी मौलिक संशोधन केले आहे. स्वातंत्र्याची 71 वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिल्यास असे दिसते की शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम आणि त्यांना सरकारचा भरभरून मिळालेला पाठिंबा यामुळेच विज्ञानक्षेत्रात चौफेर प्रगती झाली आहे. आज तंत्रसमृद्ध देशांच्या यादीत भारत अभिमानाने उभा आहे, तो या शास्त्रज्ञांमुळेच! 
विज्ञानाच्या क्षेत्रात भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतरच संशोधन सुरू झाले आणि इंग्रज संशोधकांनीच ते केले; परंतु काही भारतीय शास्त्रज्ञांनीही त्यांच्याबरोबर काही प्रयोग केले आणि यशही मिळविले. 14 नोव्हेंबर 1941 रोजी सीएसआयआरच्या स्थापनेचा प्रस्ताव केंद्रीय असेम्ब्लीत संमत झाला, ते संशोधनांच्या दिशेने भारतातील पहिले पाऊल ठरले. त्यानंतर 26 डिसेंबर 1941 रोजी सर ए. रामास्वामी मुदलीयार आणि डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेची (कौन्सिल ऑफ सायंटिफिक ऍण्ड इंडस्ट्रियल रिसर्च -सीएसआयआर) प्रत्यक्ष स्थापना झाली. या परिषदेचा पाया इंग्रजांच्या काळातच रचला गेल्यामुळे त्यांच्याचकडे संस्थेची बहुतांश सूत्रे होती. त्यामुळे विकास आणि संशोधनाचे फारसे कार्य झाले नाही.
परंतु देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात आधुनिक, वैज्ञानिक भारताची वाटचाल दमदारपणे सुरू झाली. लोकांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या दृष्टिकोनामुळेच त्यांनी विज्ञानाच्या विकासाचे कार्य डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांच्याकडे सोपविले. त्यामुळेच डॉ. भटनागर यांना औद्योगिक विकासाचे प्रणेते ठरण्याचा मान मिळाला. आजही विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनासाठी दिला जाणारा देशातील सर्वोच्च पुरस्कार डॉ. भटनागर यांच्या नावानेच दिला जातो. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या साखळीतील पहिली होय. 1955 मध्ये डॉ. भटनागर यांचे निधन झाले, तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी 15 राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना झालेली होती आणि त्यातील प्रत्येक प्रयोगशाळा कोणत्या ना कोणत्या उद्योगाशी जोडलेली होती.
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा होय. देशाच्या एकंदर लोकसंख्येच्या 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. भारतीय कृषीच्या क्षेत्रात विसाव्या शतकातील सहावे शतक मैलाचा दगड ठरले. डॉ. बी. पी. पाल, डॉ. एम. एस. स्वामिनाथन आणि डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रयत्नांमधून भारतात घडून आलेल्या हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला. वर्गीस कुरियन यांनी देशात धवलक्रांती आणून दुग्धोत्पादनातही भारताला पहिला क्रमांक प्राप्त करून दिला. पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन या क्षेत्रांतही आपण स्वावलंबी बनलो. 1905 मध्ये बिहारमधील पूसा येथे इम्पीरियल ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि तेव्हापासून सध्याच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेपर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात ज्यादा उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या अनेक जाती विकसित करण्यात आल्या. कपाशीची पहिली संकरित जात भारतीय संशोधकांनीच विकसित केलेली आहे. कृषी क्षेत्रातील संशोधकांनी देशाला अन्नसुरक्षा बहाल करण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल केली.
डॉ. होमी भाभा यांच्या प्रयत्नांमधून भारतात अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. अणुऊर्जेचा वापर शांततापूर्ण कार्यासाठी करणे हे या आयोगाचे उद्दिष्ट होते. तेव्हापासून आजवर झालेल्या संशोधनाच्या परिणामी आपण आज खनिज शोधण्यासाठी इंधननिर्मिती, टाकाऊ पदार्थांमधून ऊर्जानिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण झालो आहोत. अणुऊर्जा क्षेत्रातील संशोधनात मुंबईच्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे. या ठिकाणी सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे आपण पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी घेऊ शकलो आणि अण्वस्त्रसंपन्न असा मोजक्‍या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला. सध्याचे युग इलेक्‍ट्रॉनिक क्रांतीचे असून, हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा उद्योग बनला आहे. इलेक्‍ट्रॉनिक उत्पादनाला गती प्राप्त करून देण्यासाठी भारताने 1970 मध्येच सरकारी इलेक्‍ट्रॉनिक विभागाची स्थापना केली.
इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रासाठीची सर्व धोरणे हा विभागच तयार करतो. माहिती तंत्रज्ञान, विशेषतः संगणक आणि दूरसंचार क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनांनी या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल, स्मार्टफोन, रेडिओ, पेजर, इंटरनेट या क्रमाने विकास होत राहिला. इलेक्‍ट्रॉनिक विभागाने माहिती तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात पोहोचविण्याचा संकल्प केला असून, त्यामुळे मानवी जीवन अधिक सुखावह करण्याचा प्रयत्न आहे. सी-डॅकने केलेली परम महासंगणकाची निर्मिती ही इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रातील आपल्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा ठरली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)