#स्वातंत्र्यदिन विशेष: तंत्रसमृद्ध देशा… (भाग ३)

जोसेफ तुस्कानो (ज्येष्ठ विज्ञानलेखक) 
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्‍यक असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच यासाठी मोठे योगदान देऊ शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाहतुकीपासून संरक्षणापर्यंत आणि इलेक्‍ट्रॉनिकपासून उपग्रह प्रक्षेपणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांनी मौलिक संशोधन केले आहे. स्वातंत्र्याची 71 वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिल्यास असे दिसते की शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम आणि त्यांना सरकारचा भरभरून मिळालेला पाठिंबा यामुळेच विज्ञानक्षेत्रात चौफेर प्रगती झाली आहे. आज तंत्रसमृद्ध देशांच्या यादीत भारत अभिमानाने उभा आहे, तो या शास्त्रज्ञांमुळेच! 
सी. व्ही. रमण यांनी प्रकाशकिरणांचे गुणधर्म तसेच आकाश आणि समुद्राच्या रंगांची व्याख्या याविषयी संशोधन केले.या संशोधनासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कारही मिळाला. एस. रामानुजम हेही अत्यंत प्रतिभाशाली गणितज्ज्ञ होते. गणितीय सिद्धांतांच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी लाभली. विद्वत्तेमुळे जगभरात प्रसिद्धी लाभलेल्या शास्त्रज्ञांमध्ये भूगर्भशास्त्रज्ञ बिरबल सहानी यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात एम. एन. साहा, एस. एन. बोस, डी. एन. विजीया आणि प्रफुल्लचंद्र राय या भारतीय शास्त्रज्ञांनी उल्लेखनीय संशोधन केले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने ज्याप्रमाणे इतर क्षेत्रांमध्ये प्रगती केली, त्याचप्रमाणे विज्ञानाच्या क्षेत्रातही भारताची घोडदौड सुरूच राहिली. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने नैसर्गिक संसाधने आणि विज्ञान असा एक विभाग सुरुवातीला निर्माण केला. विज्ञानाच्या इतर शाखांमध्येही भारताने प्रचंड प्रगती केली. खगोलविज्ञानात प्राचीन ज्ञानाच्या आधारावरच भारतात संशोधनकार्य सुरू झाले होते. आज भारतीय अंतरिक्ष शास्त्रज्ञ जगाला आचंबित करणारी प्रगती साधत आहेत. आपण स्वतः तयार केलेले उपग्रह, प्रक्षेपक आणि त्यातील क्रायोजेनिक इंजिने यामुळे भारत उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ काबीज करीत आहे.
अनेक देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम “इस्रो’ ही भारतीय संस्था आज करीत आहे. कारगिलच्या युद्धावेळी अमेरिकेने भारताला जीपीएस प्रणाली देण्यास नकार दिला होता; परंतु आज एकापाठोपाठ एक सात उपग्रह सोडून भारताने आपली जीपीएस प्रणाली विकसित केली. एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम आज भारताच्या नावावर आहे. तसेच दक्षिण आशियातील आपल्या मित्रदेशांना भारताने चक्क एक उपग्रहच भेट म्हणून दिला. ही देदीप्यमान प्रगती जगाला तोंडात बोटे घालायला लावणारी ठरली. मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून, चांद्रमोहिमेचा दुसरा टप्पाही भारत लवकरच हाती घेत आहे. भारताच्या दूरसंवेदक नेटवर्कमध्ये 634 उपग्रहांचा समावेश आहे.
अंतरिक्ष कार्यक्रमांत एकापाठोपाठ एक यशस्विता मिळविल्यामुळे भारताने संरक्षण क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. विविध अंतरांवर मारा करणारी क्षेपणास्त्रे भारत आज अभिमानाने बाळगून आहे. तसेच अणुऊर्जा विकासाबरोबरच अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून वीजनिर्मितीसाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच भारताने सौरऊर्जा आणि डिझेल अशा दुहेरी ऊर्जेवर चालणारी रेल्वे तयार केली असून, आता प्रत्येक रेल्वेवर सोलर पॅनेल बसवून सौरऊर्जेवर डब्यातील वापराची वीज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
क्षेत्र कोणतेही असो, भारतीय शास्त्रज्ञांनी त्यात आगेकूचच केल्याचे दिसून येते. आगामी काळात आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारताला अर्थव्यवस्था मजबूत करावी लागणार आहे आणि त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच उपयोगी पडणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात चौफेर प्रगती करणाऱ्या आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहेच; शिवाय विज्ञानातील गरुडभरारीमुळे भारताचा एक दरारा जगभरात निर्माण झाला आहे. स्वयंपूर्णता आणि सातत्याने प्रयत्न हे तत्त्व भारताने स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजअखेर बाळगल्यामुळेच ही चौफेर प्रगती शक्‍य झाली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)