उद्योजक बनवणारे शिक्षण हवे – पवार

देऊर येथे संभाजीराव कदम महाविद्यालयात शुभचिंतन समारंभ

पिपोंडे – आजची शिक्षण पद्धती ही नोकरीप्रधान बनलेली आहे. नोकऱ्या डोळ्यापुढे ठेवून शैक्षणिक करिअर निवडले जाते. विद्यापीठे आणि महाविद्यालये शिक्षणाबरोबरच नोकऱ्या देण्यासाठी विविध कंपन्या व संस्थांच्या मुलाखतींचे आयोजन करतात, हे चांगले आहे. परंतु मुलांना नोकऱ्यांबरोबर व्यवसाय आणि उद्योगाबाबतचे ज्ञान देवून त्यांना नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक बनवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे प्रतिपादन सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांनी केले.

देऊर, ता. कोरेगाव येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात शुभचिंतन समारंभात ते बोलत होते.
पवार म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान चांगले मिळते, परंतु व्यवहार ज्ञानाची सांगड घालण्यात ते कमी पडतात. त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या रोजगाराच्या संधी आणि दुसऱ्या बाजूला बेकारांची वाढती फौज निर्माण होत आहे. यातून आलेल्या नैराशातून आत्मघात किंवा समाज विघातक कृत्ये घडतात. यासाठी शिक्षण नोकरी करण्यासाठी नाही तर व्यवहारज्ञान वाढविण्यासाठी घ्या. पूर्वी शासनाच्या प्राथमिक शाळांना जीवन शिक्षण विद्यामंदिर असे नाव होते. आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे नामांतर झाल्यापासून जीवन जगण्यासाठी लागणारे संस्कारी शिक्षण कमी झाले की काय? असा प्रश्‍न पडतो आहे.

महाराष्ट्र केसरी चॅम्पियन पै.संग्राम जाधव, किसनराव कदम, अरविंद कदम, धनसिंग कदम, प्राचार्य डॉ. भारत भोसले, सर्जेरावदादा कदम, रामभाऊ कदम, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. शिवाजी चवरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अशोक शेलार व प्रा.सुर्यकांत अदाटे यांनी केले. डॉ. मनोज गुजर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)