निविदाच न निघालेल्या शिक्षकांवर वणवण करण्याची वेळ
सातारा- सातारा नगरपालिका शिक्षण मंडळात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन गेल्या दोन महिन्यापासून रखडले आहे. शिक्षकांचे वेतन निश्चित करणारी निविदाच अद्याप न निघाल्याने मंडळाच्या पंधरा शिक्षकांवर वणवण करण्याची वेळ आली आहे.
सातारा पालिका शिक्षण मंडळाच्या एकूण सतरा शाळा, ऐंशी शिक्षक व 1750 विद्यार्थी असा एकूण लवाजामा आहे. शाळेच्या प्राथमिक व पूर्व माध्यमिक अशा मराठी व सेमी इंग्लिश विभागासाठी व पालिका शाळांचा पट वाढविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर शिक्षक सेवा सोसायटी किंवा तत्सम संस्थेच्या माध्यमातून निविदा काढून पुरविली जाते. गेल्या चार वर्षांपासून या निर्णयाची धोरणात्मक अंमलबजावणी केली जात आहे. कंत्राटी तत्त्वाची सेवा एकूण दहा शाळांना प्ले गुप व सेमी इंग्लिश करिता दिली जात असून या शिक्षकांनी खासगी शाळांच्या स्पर्धांना तोंड देत पटसंख्या टिकवण्याचे काम केले आहे.
एकीकडे पूर्ण क्षमतेने शैक्षणिक सेवा दिली जात असताना या कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाचा घोळ तांत्रिक मुद्द्यावर घातला जात आहे. पंधरा शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन रखडवले आहे. तीन वर्षांपूर्वी सदर बझारमधील एका माजी नगरसेवकाच्या स्वयंरोजगार संस्थेने सुध्दा वेतन अदा करताना चालढकल करत मोठा मलिदा लाटल्याची चर्चा होती.
आता पुन्हा 17 जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झालेले असताना या कंत्राटी शिक्षकांची सेवा कोणत्याही ऑर्डर शिवाय रामभरोसे ठेवण्यात आली आहे. तुमचा पगार आमच्या खात्यात जमा करून तुम्हाला अदा करू पण तुम्ही हजर व्हा असा तोंडी आदेश सदर बझारमधील शाळांचे मुख्याध्यापक सांगत असून केवळ अशा आदेशावर हजर कसे व्हायचे ही शिक्षकांची अडचण झाली आहे.