पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची कसरत 

भाउसाहेब वाडगे
मिरजगाव – पटसंख्या वाढविण्यासाठी झेडपी शाळा व खासगी संस्थांतील शिक्षकांची चांगलीच चढाओढ लागली आहे. सरकारच्या धोरणाने मराठी शाळांसमोर पटसंख्या वाढविण्याचे आव्हान असताना खासगी शाळांनाही विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केल्याचे पहायला मिळत आहे. कमी पटाअभावी शिक्षक अतिरिक्त होउन आपली गैरसोयीच्या ठिकाणी बदली होऊ नये, म्हणुन झेडपीचा शिक्षक घरोघरी फिरत आहेत तर खासगी संस्थेतील शिक्षक आपली नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थी शोधताना दिसत आहेत.

शिक्षणाच्या वाढत्या स्पर्धेत मुलांना आपल्याच शाळेमध्ये आणण्यासठी कोणी दर्जा व गुणवत्तेची भाषा बोलतात, तर कोणी उज्ज्वल भविष्य, एका छताखाली सर्व सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारचे ज्ञान, नवजीवन शिक्षण अशी जाहिरात करून पालकांना मोठी स्वप्ने दाखवतात. काही शाळा आयएसओची आमिषे दाखवतात आणि ईमारतीचे देखावे दाखवून पालकांना आकर्षित करतात.

काही शाळेचा अपवाद वगळता एकीकडे मराठी शाळेच्या शिक्षणातील भाषांचा दर्जा तर दुसरीकडे इंग्रजी शाळेचा देखावा व भूलभूलैय्या बघता पालक पाल्याच्या प्रवेशाबाबत व शिक्षणाबाबत संभ्रमावस्थेत सापडला आहे. कळत पण वळत नाही याप्रमाणे जास्त शुल्क असणाऱ्या शाळांत गुणवत्ता व दर्जा दिसत असली तरी आर्थिक परिस्थिती अभावी त्या ठिकाणी शाळेत मुले टाकू शकत नाहीत, अशी स्थिती अनेक पालकांची झाली आहे. शाळांची वाढती संख्या व वाढती स्पर्धा यामुळे शाळांना विद्यार्थी मिळणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

इंग्रजी शाळेच्या तुलनेत मराठी शाळांनी आपला दर्जा सुधारला आहे. भौतिक सुविधाही आता पालकांना आकर्षित करत आहे. खासगी शाळेच्या तुलनेत मराठी शाळेचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत वाड्या वस्त्यांवरील पालकांचे ब्रेनवॉंश करण्याचे काम शिक्षक करत आहेत. काही इंग्रजी संस्थाचालकांनी अथवा शाळांनी केलेल्या शिक्षणाचे बाजारीकरण सांगूण आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवित असलेल्या नवनवीन शैक्षणिक उपक्रम, ज्ञानरचना आयएसची निर्मिती, वाढते इंग्रजीचे महत्व लक्षात घेता शाळेत सुरू केलेल्या सेमी इंग्लिश वर्ग, गुणवत्ता व बदललेला दर्जा आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेउन उच्चपदस्थ झालेले अधिकारी यांची उदाहरणे देऊन पालकांना मराठी शाळेकडे आकर्षित करताना शिक्षक दिसत आहेत. दरम्यान गावोगावी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटल्याने लाखो रुपये खर्चुन नव्या शिक्षण संस्थांनी आपले पाय पसरवले आहेत. कमी अंतरावर जवळजवळ प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याने त्यात जि.प शाळेचा सुधारीत दर्जा यामुळे खासगी संस्था चालकांसमोरही शाळा सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी खासगी शिक्षकांना राबविले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)