शिक्षक दांपत्याची पगारातून मदत

सणबूर – वडजाईनगर (सुतारवाडी, ता. पाटण) येथील नरेंद्र व शोभा मोरे या शिक्षक दांपत्याने स्वत:च्या पगारातील काही भाग हा गरजूंना मदत करण्यासाठी काढून यापर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला आहे. शिक्षक दांपत्याच्या या निःस्वार्थपणे सुरू असलेल्या सेवेबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मोरे हे दांपत्य लोकमान्यनगर येथील विद्यामंदिरात कार्यरत आहेत. शोभा मोरे यांनी एमएसडब्ल्यूची पदविका संपादन केली असून, यशोदा फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी त्यांचे भरीव कार्य सुरू आहे. त्यास पती नरेंद्र यांची साथ मिळत आहे. स्वत:च्या पगारातील काही हिस्सा सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी खर्च करत ठाणे-रायगड जिल्ह्यांतील विविध शाळांतून त्यांनी गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शालेय साहित्य वाटप यासह सहा ठिकाणी डिजिटल क्‍लासरूमची संकल्पनाही राबवली आहे.

गावाकडेही अशा विविध उपक्रमांतून त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. सुतारवाडी परिसरातील अनेक शाळांनाही त्यांनी आत्तापर्यंत भरीव स्वरूपाची मदत केली आहे. सध्या उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या या दांपत्याने वडजाईनगरमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या 42 विद्यार्थ्याना सुमारे 25 हजार रुपये किमतीच्या शैक्षणिक साहित्यांचे वाटप सरपंच कमल मोरे, सदस्या कल्पना मोरे आदींसह ग्रामस्थांच्या हस्ते केले. जयवंत मोरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी गावच्या प्राथमिक शाळेतील 20 विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन केल्याचेही मोरे दांपत्यांनी यावेळी सांगितले. जयवंत मोरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने या दांपत्यांचा विशेष सत्कार करुन कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)