शिक्षक भरवणार सुटीच्या दिवशी शाळा!

अकोले – शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये जवळ जवळ सगळे शिक्षक सहभागी झाल्यामुळे तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश प्राथमिक शाळांचे कामकाज आज दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद होते. संपामुळे शाळांचे बुडालेले तास आणि मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तालुक्‍यातील शिक्षक सुटीच्या दिवशी शाळा भरवणार आहेत. प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात शिक्षक संघटनांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी लढा उभारताना कर्तव्याची जाण ठेवून शिक्षक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे शैक्षणिक वर्तुळातून तसेच पालकांनी स्वागत केले आहे.

अशैक्षणिक (ऑनलाइन) कामे बंद करून शिक्षकांना केवळ शिकवू द्या. जुनी पेन्शन योजना लागू करा. वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीचा जाचक जीआर मागे घ्या. शिक्षक-शिक्षकेतरांची भरती तातडीने सुरु करावी. अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारांना सेवेत सामावून घ्या. शिक्षणावरील खर्च वाढवावा.शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे. थातूर-मातूर कारणे पुढे करत शाळा बंद करू नयेत. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या व्यक्‍तींचे मानधन वाढवावे. 7 वा सातवा वेतन आयोग लागू करावा आदी मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी संपात उडी घेतली आहे. राज्य सरकारच्या धरसोड वृत्तीच्या शैक्षणिक धोरणांबाबत शिक्षकांत मोठा असंतोष धुमसत आहे. त्यामुळेच शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेल्या संपाला राज्यभरातल्या शिक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज दुपारी अकोले पंचायत समितीसमोर प्राथमिक शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केले. तालुक्‍यातील 962 शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना विविध वक्‍त्यांनी शासनाच्या शैक्षणिक धरसोडीच्या धोरणांवर कठोर टीका केली. शिक्षकांना लावलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधताना एकूण शिक्षणाच्या मुद्‌द्‌यावर सुरु असलेला शिक्षकांचा हा संप केवळ वेतन आयोग मागण्यासाठी सुरु असल्याचे चित्र रंगवून शिक्षकांची बदनामी सुरु असल्याबद्दल यावेळी तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली. संप मिटला तरीही बहुजनांचे शिक्षण वाचवण्यासाठी हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असेही यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक संघटनांचे कार्यकर्ते बाळासाहेब आरोटे, भागवत लेंडे, अनिल मोहिते, सतीश जाधव, राजेंद्र सदगीर, प्रतिक नेटके, शिक्षक बॅंकेचे संचालक बाळासाहेब मुखेकर, केंद्रप्रमुख संघटनेचे अशोक ढगे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेते मोहन कडलग, विस्तार अधिकारी संघटनेचे राजेश पावसे,बाळासाहेब दोरगे यांची भाषणे झाली. प्रवीण साळवे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)