प्राथमिक शाळेत शिक्षक-विद्यार्थी शिपायाच्या भूमिकेत

विद्यार्थी झाडतायत वर्गखोल्या अन्‌ भरतायंत पाणी

प्रकाश राजेघाटगे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुध- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिपाई नसल्याने शिक्षकांना व विद्यार्थ्यांना चक्क शिपायाची भुमिका पार पाडावी लागत आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळांमध्ये ‘शिपाई’ हे पदच भरण्याची तरतूद नाही. पटसंख्या 500 च्यावर असली तर फक्त एकच शिपाई भरण्याची तरतूद असल्याचे समजते. यामुळे इतर शाळांमध्ये शिक्षकांना अध्यापनाशिवाय शिपायाची कामे करावी लागत आहेत तर वेळप्रसंगी विद्यार्थ्यांनाही कामे करावी लागत आहेत.

खटाव तालुक्‍यामध्ये एकूण 247 प्राथमिक शाळा आहेत. परंतु शिपाई मात्र एकाही शाळेला नाही. काही वर्षापूर्वी तालुक्‍यातील 11 ठिकाणी तालुका कार्यालये होती. यापैकी वडूज, मायणी, खटाव येथील शाळेमध्ये नव्हे तर कार्यालयात प्रत्येकी एक शिपाई होता तर आठ ठिकाणी शिपाई नव्हते. त्यामध्येही पुन्हा वडूज येयील शिक्षण विभागाकडे (पंचायत समिती) दोनच शिपाई असल्यामुळे तालुका कार्यालयासाठी असलेले शिपाईसुद्धा शिक्षण विभागाकडेच काम करत असल्याने तालुका कार्यालयात शिपाई असूनही नसल्यासारखे होते. गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी तालुका कार्यालये बंद केल्यामुळे असणारे शिपाईसुध्दा काढून घेण्यात आले होते.

आज पंचायत समितीच्या शिक्षण विभागात फक्त एकच शिपाई काम करत आहे. राज्यामधील सर्व प्राथमिक शिक्षकावर मुळातच असलेला अशैक्षणिक कामांचा भार आणि त्यातच शिपायांची कामे त्यामुळे बहुतेक वेळा हा कामाचा बोजा हलका करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही वेठीस धरण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आजही तशीच सुरू आहे. जोपर्यंत विद्यार्थ्याचे पालक याबाबत ठोस भूमिका घेत नाहीत. तोपर्यंत ही परंपरा अशीच सुरूच राहणार आहे. शहरी भागापेक्षा विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकावर अशैक्षणिक कामांचi बोजा आहे. त्यामध्ये साधा शिपाई न नेमता त्यांचा कामाची जबाबदारी सुद्धा शिक्षकांवरच का देण्यात आली आहे हे कोडेसुद्धा न उलगडणारेच आहे. अशा वेळी हे अतिरिक्त शिपायाचे काम विद्यार्थ्यांवर लादले जाते.

माध्यमिक शाळेतील शिपायाप्रमाणे वर्गाच्या खोल्या झाडणे, सारवणे’ घंटा देणे पिण्याचे पाणी भरणे’ पोस्टातून शाळेची पत्रे, शाळेसाठी लागणारे साहित्य आणणे, वर्गामधून नोटीसा फिरविणे एवढेच काय प्रसंगी पानपट्टीच्या दुकानातून पान’ तंबाखू, गुटखा पुड्या आणण्यासाठीही कामे विद्यार्थ्यांना सांगितली जातात. एवढेच काय, काही ठिकाणी शिक्षिकांची मुले सांभाळण्याचे कामही काही विद्यार्थांना करावे लागते. यासंदर्भात शासनाने गांभीर्याने विचार करुन प्राथमिक शाळांमध्ये शिपाई पदाची भरती करण्याविषयी नियमातही तशी तरतूद करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगांचाही प्रश्न सोडविण्यास हातभार लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)