पवित्र पोर्टलवर तांत्रिक अडचणी; शाळांचा प्राधान्यक्रम नोंदीसाठी करावी लागणार प्रतीक्षा
पुणे – राज्य शासनाच्या शिक्षक भरतीच्या “पवित्र पोर्टल’वर तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. यामुळे उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी आणखी दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विघ्न वाढत चालल्याने भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडणार हे आता उघड होऊ लागले आहे.
पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्याचा गाजावाजा करत शासनाने “पवित्र पोर्टल’ कार्यान्वित करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. काही उमेदवारांनी पोर्टलवर माहिती भरताना खूप चुका केल्या आहेत. त्यांना सतत चुका दुरुस्तीसाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली; परंतु उमेदवारांच्या तक्रारी संपत नाहीत. त्यातच आता पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. सॉफ्टवेअरची तपासणी करून तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तांत्रिक सल्लागारांच्या पाच व्यक्तींचे पथकही कार्यरत आहे.
पोर्टलवर एकूण 1 लाख 24 हजार 648 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 16 हजार 204 उमेदवारांचीच नोंदणी पात्र ठरली आहे. उर्वरित 8 हजार 444 उमेदवारांनी सुरुवातीलाच प्रोफाईल अपडेटच केले नाही. त्यामुळे ते आधीच स्पर्धेतून बाद झाले आहेत. एकूण 12 हजार शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोर्टलवर भरलेल्या माहितीतील आरक्षण, माध्यम, जन्मतारीख, मोबाइल नंबर बदल, शैक्षणिक अर्हता बदल आदी माहिती अपडेट करण्यासाठी आत्तापर्यंत एकूण 15 हजार अर्ज उमेदवारांकडून दाखल करण्यात आले होते. दाखल झालेल्या अर्जांनुसार तांत्रिक सल्लागारांच्या पथकाकडून बदल करण्यात आले असून अर्ज स्वप्रमाणित करण्यातील अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. काही उमेदवारांनी पोर्टलवर शाळांचे प्राधान्यक्रम नोंदविले आहेत. मात्र, ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता सर्वच उमेदवारांना पुन्हा नव्याने शाळांचा प्राधान्यक्रम भरावे लागणार आहेत. मात्र, यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. एकूण सर्व रिक्त पदांच्या जाहिराती व मुलाखतीशिवाय संस्थांची यादी पोर्टलवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षकांच्या सुमारे दीड हजार जागा दर्शविण्यात आल्या आहेत. मात्र, एवढ्या प्रमाणात उमेदवारांची नोंदणीच झालेली नाही. इतरही काही माध्यमांसाठी उमेदवार न मिळाल्यास त्या जागा माध्यमांसाठी वर्ग करण्यात येणार आहेत. मात्र, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पवित्र पोर्टलवर येत असलेल्या अचडणींमुळे उमेदवारांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षणमंत्री घेणार अधिकाऱ्यांची बैठक
“पवित्र पोर्टल’वरील शिक्षक भरतीत येत असलेल्या विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (गुरुवार) मुंबई येथे महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिक्षण आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारच्या अडचणी मांडण्यात येणार आहेत. यावर काय निर्णय होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.