शिक्षक भरती ऑगस्ट अखेर सुरू

सुनील गाडगे : शिक्षक भारतीची सहविचार सभा

नगर  – गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. शक्‍यतो ऑगस्ट अखेरपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाने निश्‍चित केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी संस्थांच्याशाळातील शिक्षकांच्या 12 हजारहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पवित्र संकेतस्थळामार्फत होत असलेल्या या भरती प्रक्रियेत 85 हजारांहून अधिक उमेदवारांनी शाळांचे पसंतीक्रम सादर केले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेली भरती प्रक्रिया तांत्रिक अडचणीत सापडून रखडली होती. याकडे शिक्षक भारतीने शिक्षण उपसंचालक यांचे लक्ष वेधले होते. यामुळे शिक्षक भारतीने तातडीची सहविचार सभा माध्यमिक शिक्षक भवनात शिक्षक नेते तथा राज्य सचिव सुनील गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, बी.आर.शिंदे, नवनाथ घोरपडे, अशोक अन्हाड, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, अशोक धनवडे, विजय लंके, शरद धोत्रे, सुनील जाधव, उच्चि माध्यमिक अध्यक्ष जितेंद्र आरु, महेश पाडेकर, संभाजी चौधरी, जॉन सोनवणे, काशिनाथ मते, मोहमंद समी शेख, सुर्यकांत बांदल, किसनदादा सोनवणे, हनुमंत बोरुडे, योगेश हराळ, शिवाजी बागल, सुरेश झिने, तुषार मरकड, संभाजी पवार, प्रदीप रुपटक्के, किशोर शिंदे, आण्णा राठोड, संजय कराड, रवींद्र गायकवाड, संजय समुद्र, सुनील गायकवाड, रावसाहेब कासार आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप बोलताना म्हणाले कि, तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी इच्छुकांनी केली होती. पवित्र संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येणार्या उमेदवारांसाठी एक जुलै रोजी पुण्यात शिबिर घेण्यात आले होते. त्यात या उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यात आल्या, असे सांगितले.

यावेळी शिक्षक नेते सुनील गाडगे बोलताना म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील सुमारे एक लाख 16 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी 30 जूनची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 85 हजारांहून अधिक उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले आहेत. या उमेदवारांना भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. या शिक्षकभरती संदर्भातील आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवारांचा निकाल दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. त्यानंतर एका पदासाठी 10 उमेदवार अशा प्रकारे मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर होईल. शक्‍यतो ऑगस्ट अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)