जुनी पेन्शन लागू करण्यास शिक्षणमंत्री सकारात्मक
नगर – 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदान सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर निर्धार धरणे आंदोलन सुरु आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेत सदर प्रश्नासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले.
शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 2005 पूर्वीच्या शिक्षकांना लवकरच पेन्शन संदर्भात आनंदाची बातमी देण्याचे सुचक वक्तव्य केल्याने जुनी पेन्शनपासून वंचित असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी माहिती दिली. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, भगवान साळुंखे, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, नरेंद्र वारकरी, संजय यवतकर यांनी जुनी पेन्शन संदर्भात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. पेन्शनच्या मागणीसाठी मंगळवारपासून शिक्षक परिषदेतर्फे आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले होते. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.