विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा

सहलीदरम्यान घडली होती दुर्घटना, चार शिक्षकांवर गुन्हा

मेढा – पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या आलगुडेवाडी, ता. फलटण येथील प्रज्वल गायकवाड या अकरा वर्षाच्या मुलाला काही बेजबाबदार शिक्षकांमुळे प्राण गमवावे लागले. या प्रकरणाची मेढा पोलिसांनी दखल घेत तब्बल तीन महिन्यानंतर कमला निमकर भवन फलटण येथील चार शिक्षकांवर गुन्हा नोंद केला आहे.

या संदर्भात सविस्तर महिती अशी, अलगुडेवाडी येथील प्रज्वल गायकवाड हा विद्यार्थी प्रगत शिक्षण संस्थेच्या फलटण येथील कमला निमकर बालभवनात इयत्ता पाचवीत शिकत होता. या शाळेने 4 जानेवारी 2019 रोजी शैक्षणिक सहल आयोजित केली होती. ही सहल लिंब येथील 12 मोटेची विहीर, मेणवली येथील ऐतिहसिक वाडा, धोम धरण आदी ठिकाणी नेण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात या ठिकाणांसह पूर्वनियोजित अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या वडाचे म्हसवे या ठिकाणी नेण्यात आली. हा प्रकार होत असताना त्याकडे विद्यार्थ्यांसमवेत असलेल्या शिक्षकांचे मात्र गांभिर्याने लक्ष नव्हते. यामुळे प्रज्वलच्या डोक्‍यात झाडाची फांदी पडून त्याचा मृत्यू झाला होता.

यानंतर संस्थेकडून प्रज्वलचे वडील नितीन गायकवाड यांना अपघाताबद्दल कळवण्यात आले. एका रुग्णवाहिकेतून प्रज्वलचे वडील नितीन गायकवाड व संस्थेतील अन्य कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र दरम्यानचा कालावधीत प्रज्वलचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. केवळ शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे प्रज्वलला प्राणास मुकावे लागल्याची चर्चा घटनेनंतर परिसरात होऊ लागली. पोलिसांनीही या घटनेबाबत गांभीर्याने दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही म्हणून प्रज्वलचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढत सहल घेऊन जाणारे शिक्षक विशाल मारुती मोहिते, अरुणा मनोहर शेवाळे, नीता नरेश सस्ते, उज्वला संजय निंबाळकर (सर्व रा. फलटण) यांच्या विरोधात निष्काळजीपणा दाखवून प्रज्वलच्या मृत्यूस कारणीभूत ठरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)