…तर आदर्श पुरस्कारांवर शिक्षकांचा बहिष्कार

पगारासाठी शिक्षक संघटनाच्या समन्वय समितीचा इशारा

नगर – दोन महिन्यांपासून थकलेले पगार न झाल्यास पाच सप्टेबरला होणाऱ्या शिक्षकदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना यासंदर्भातील निवेदन समन्वय समितीने दिले आहे.

जून व जुलै या दोन महिन्यांचे पगार 21 ऑगस्टपर्यंत झालेले नाहीत. जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने शिक्षकांच्या पाल्याचे नवीन प्रवेश, वार्षिक शुल्क, साहित्य खरेदी, गणवेश खरेदी यासाठी शिक्षकांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. शिक्षकांना समाजापुढे हात पसरावे लागले. एकंदरित गेल्या अडीच महिन्यांपासून पगार न झाल्याने शिक्षकांची सामाजिक अप्रतिष्ठा व आर्थिक कुचंबना झाली. आता 4 सप्टेंबरपर्यंत जून, जुलै व ऑगस्ट या तीनही महिन्यांचे पगार करावेत, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.

पगाराच्या विलंबाबत संघटनेने प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केल्यावर प्रशासन संघटनांबरोबर चर्चा करते. यापुढे असे होणार नाही, असे आश्वासन दिले जाते. मात्र गेले वर्षानुवर्षे याबाबत काहीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. या बाबीमुळं जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शिक्षकांकडून प्रत्येक काम तत्परतेने होण्याची प्रशासनाकडून अपेक्षा केली जाते व शिक्षक ते करतातही. पगार मात्र वेळेवर का होत नाहीत, हे समजत नाही. पगार वेळेवर होण्यासाठी संघटनांनी यापूर्वी अनेक उपाय सुचवले, त्याची अंमलबजावणी होताना दिसली नाही.

प्रलंबित दोन महिन्यांचे पगार तत्काळ व ऑगस्ट महिन्याचा पगार 5 सप्टेबरच्या आत करण्यासाठी तसेच यापुढे प्रत्येक महिन्याचा पगार 5 तारखेच्या आत होण्यासाठी आपण आपल्या वेतनव्यवस्थेत सुसूत्रता आणावी, असेही निवेदनात म्हटले आहे. शिक्षकांना पगार न मिळाल्यास 5 सप्टेबरला शिक्षकदिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येईल. त्याचप्रमाणे कार्यक्रम स्थळाबाहेर मूक धरणे आंदोलन केले जाईल, असाही इशारा निवेदनातून समन्वय समितीने दिले आहे.

शिक्षकांच्या वेतनासाठी उषोषणाला बसू : कानवडे

पगाराची अनिश्‍चितता हे शिक्षकांचे मनोधैर्य खचविणारी आहे. महागाईच्या काळात घर चालविणे सोपे नाही. शिक्षकांना जुनपासून वेतनापासून वंचित ठेवले आहे. नगर जिल्ह्याच्या शिक्षकांच्याच वेतनाची परिस्थिती आहे. यामागे काहीतरी डाव आहे. वेतन एक तारखेला नियमित होत असताना अहमदनगर जिल्हा परिषदेत वेतनाबाबत हाल अन्‌ उशिर कायम आहे. याबद्दल वारंवार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करुन देखील ही अनियमितता कायम आहे.शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच होण्यासाठी आपण उपोषणाला बसणार असल्याची प्रतिक्रिया पेंशन हक्क संघटनेकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद कानवडे यांनी नोंदवली. शिक्षकांचे वेतन एक तारखेला व्हावेत, असा शासननिर्णय आहे. याकडे पेंशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिलिंद कानवडे यांचे लक्ष वेधले. जून ते ऑगस्टचे वेतन शिक्षकदिनाच्या आत न झालेस पाच सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या दिवशीच जिल्ह्यातील अकरा हजार शिक्षकांतर्फे जिल्हा परिषदेसमोर आत्मक्‍लेश उपोषण करू, असे कानवडे यांनी सांगितले.

“नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे अनेक शिक्षक खाजगी सावकारांच्या गळाला लागले आहे. अवाजवी व्याजाने घरखर्च चालविण्यासाठी शिक्षकांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पगार जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे पगार वेळेवर होणे गरजेचे आहे.
– सुदर्शन शिंदे

“शिक्षकांचे पगार वेळत न होण्यामागे जिल्हा परिषद आणि शिक्षक बॅंकेची खेळी आहे. पगार थकल्याने कर्जदार शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकतात. परिणामी कर्जावर चक्रवाढ व्याज सुरू होते. यातून जिल्हा परिषदे आणि शिक्षक बॅंकेला मुबलक पैसा मिळतो. शिक्षकांचे यात होणारे आर्थिक नुकसान थांबविण्यासाठी संघटीतपणे लढले पाहिजे.
– शैलेश खामकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)