शेतकरीविरोधी सरकारला धडा शिकवा ः उदयनराजे 

औद्योगिक वसाहतीत सह्याद्री समूहाचा मेळावा

सातारा – देशात 80 टक्के लोक शेतकरी आहेत. त्यांच्या हिताचे धोरण ठरविण्याऐवजी शेतकरी आत्महत्यांचे तोरण सरकारने बांधले. गेल्या 40 वर्षांत घडल्या नाहीत इतक्‍या शेतकरी आत्महत्या गेल्या 5 वर्षांत झाल्या. शेतकरीविरोधी सरकारला मतदानाद्वारे धडा शिकवा, अशी जळजळीत टीका श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली. सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ औद्योगिक वसाहतीतील गुलमोहर मंगल कार्यालयात सह्याद्री समूहाचा मेळावा झाला, त्यात ते बोलत होते.

यावेळी सह्याद्री सहकारी बॅंकेचे चेअरमन व सह्याद्री परिवाराचे कुटुंबप्रमुख पुरुषोत्तम माने, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, रहिमतपूरचे उपनगराध्यक्ष चांदभाई आत्तार, शंकर शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. श्री. छ. उदयनराजे म्हणाले, या सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. त्यांनी लोकांची मते मिळवली; परंतु लोकांच्या वैचारिक मताला काडीचीही किंमत दिली नाही. आज आपण सज्ञान आहोत, आपले भले-बुरे आपल्याला कळते. परंतु उद्याच्या पिढीचा आपल्याला विचार करायचा आहे. छोटी-छोटी मुले हा देशाचा भविष्यकाळ आहे. त्यांचा विचार करुन मतदारांनी कौल द्यावा.

सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबईला गेले. तिथे ते मेहनत करून, स्वत:च्या हिमतीवर स्वत:च्या पायावर उभे राहिले. संघटनात्मक बळावर सर्वांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले. पुरुषोत्तम माने यांनी सह्याद्री बॅंकेच्या माध्यमातून अनेक माथाडी कामगारांना मदत केली. त्यामुळे या सर्वांचा मला अभिमान वाटतो. आज माथाडी कामगार हा मुंबईचा कणा आहे. एक दिवस काम थांबवले, तर मुंबई ठप्प होऊ शकते इतकी ताकद निर्माण केली आहे, असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)