अबाऊट टर्न: तयारी…

उच्च कार्यक्षमता, शुद्ध आचरण, प्रामाणिकपणा हे शब्द आजकाल फक्‍त शब्दच वाटत असले, तरी विशिष्ट समाजघटकांकडून आजही या गुणांची अपेक्षा केली जाते. उदाहरणार्थ, रोजच्या जीवनात आपण स्वतः कितीही विधिनिषेध सोडून वागत असलो, तरी डॉक्‍टर मात्र देवाचा अवतारच वाटायला हवेत आणि नवी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचं वर्तन चोखच असायला हवं. खरं तर निवडणुकीचं वातावरण असताना मानवी गुणवर्णन करणाऱ्या आणि तत्त्वनिष्ठा सांगणाऱ्या शब्दांची आठवणही कुणाला होत नाही. गढूळ वातावरण आणि चिखलफेक, पैसा आणि ताकदीचा मुक्‍त वापर, आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अर्वाच्य भाषा वापरणं, मत विकणं किंवा घाबरून देऊन टाकणं, असा सगळा कोलाहल झालेला असताना पोलिसांकडून मात्र अत्यंत कमी संख्याबळानिशी चोख ड्युटी बजावण्याची अपेक्षा ठेवली जाते.

खरं तर निवडणुकीच्या कोलाहलात आपलं लक्ष पोलिसांकडे फारसं जातसुद्धा नाही. निवडणुकीपूर्वी सरकारी खात्यांमध्ये महाभरती होणार की नाही, हा प्रश्‍न इतका महत्त्वाचा ठरला, की पोलिसांची संख्या निवडणुकीच्या दृष्टीनं पुरेशी आहे की नाही, हे पाहायलाही आपल्याला सवड झाली नाही. मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी तासन्‌तास पहाऱ्याला उभ्या असणाऱ्या पोलिसांना कुठलीतरी स्वयंसेवी संस्था फूड पॅकेट्‌स पुरवते आणि फोटोसह ती बातमी वाचून आपणच जणू मोठं कर्तव्य पार पाडलं, असं आपल्याला वाटू लागतं.

अवेळी जेवण, अपुरी झोप, ताणतणाव, एकीकडे बंदोबस्त, दुसरीकडे गुन्हेगारांचा शोध, शिवाय कोर्टाच्या चकरा, पंचनामे, अपघातावेळी अचानक धावाधाव… हे सगळं करूनसुद्धा पोलीस कसे “फिट्‌’ असायला हवेत. ढेरपोट्या पोलिसांची आपण खिल्ली उडवणार. निवडणुकीच्या वेळी तर पोलीस अत्यंत कार्यक्षम राहायला हवेत. आपण जर निवडणुकीला “लोकशाहीचा उत्सव’ म्हणतो तर पोलिसांचं काम वाढतंच कसं? हा प्रश्‍न आपल्याला पडत नाही. पोलिसांबरोबरच अन्य सुरक्षा दलांमधले जवानही निवडणुकीत आपल्यासाठी घाम गाळतात. रेल्वे पोलीस दलानंसुद्धा आता निवडणुकीची तयारी केलीय.

बंदोबस्तासाठी जवान फिट्‌ राहावेत म्हणून, पोट कमी करण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना दिले गेलेत. त्यासाठी खास शिबिर आयोजित करून 45 वर्षांपेक्षा कमी वय, 85 किलोपेक्षा अधिक वजन आणि 40 इंचांपेक्षा अधिक पोट असणाऱ्या पोलिसांकडून “वर्क आउट’ करून घेतलं जातंय. दोन आठवड्यांच्या या शिबिरात दररोज धावणं, दोरीवरच्या उड्या, पुल-अप्स आणि इतर व्यायाम करून घेतला जातोय. ध्यानधारणा, योग वगैरे आहेच! निवडणुकीत शारीरिक श्रम कमी म्हणून की काय, यावेळी पोलिसांना सोशल मीडियावरही नजर ठेवायचीय. म्हणजे, नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांच्या हालचालींवर तर वॉच ठेवायचाच; शिवाय मोबाइलच्या माध्यमातून काय हालचाली चालल्यात, तेही पाहायचं! खोट्या बातम्या शोधून काढायच्या.

एका बाजूला आमिषं, पैशांची देवाणघेवाण, दमदाट्या, हाणामाऱ्या, दबावतंत्र असले प्रकार होत राहणार आणि त्याविषयी कुणी काही बोलणारही नाही. दुसरीकडे, सामाजिक तणाव कमी करण्यासाठी पोलीस स्वतःवरचा ताण वाढवून घेणार. अत्यल्प संख्याबळ असताना धावाधाव करत राहणार. शिवाय, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य निवडणूक आयोगाच्या नियमात बसतंय की नाही, हे पाहण्यासाठी सोशल मीडियावर नजर ठेवणार. जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामस्थांची श्रमदान करण्याची तयारी असते, तसं निवडणूककाळात आयटी तज्ज्ञांनी का करू नये?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)