ई-वॉलेटवर भरता येणार पालिकेचा कर

भीम, पेटीएम वॉलेट सेवा : सवलत मिळणेही होणार शक्‍य
 
पुणे – महापालिकेचा मिळकतकर तसेच इतर विभागांचे शुल्क लवकरच पुणेकरांना केंद्राच्या भीम मोबाइल ऍपसह पेटीएम या ऑनलाइन वॉलेटवरही भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मिळकतकर तसेच पालिकेचे इतर सेवा शुल्क भरण्यासाठी आणखी एक सुविधा उपलब्ध होणार असून, या ऍपद्वारे बील भरल्यानंतरही कर भरणाऱ्या नागरिकांना सवलतही मिळणे शक्‍य होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून याबाबतचा प्रस्ताव त्यांच्याकडून पालिकेस दिला जाणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेस मिळकतकराचे सर्वाधिक उत्पन्न मिळते. महापालिकेकडून रोख रकमेसह धनादेश आणि ऑनलाइन बॅकींगद्वारे हे शुल्क स्विकारले जाते. त्यात दरवर्षी सुमारे 46 टक्‍के नागरिक कॅशलेस स्वरुपात मिळकतकराचा भरणा करतात, तर उर्वरीत नागरिक अद्यापही रोख स्वरुपातच महापालिकेचा मिळकत भरतात. मात्र, देशात झालेल्या नोटाबंदीनंतर ऑनलाइन स्वरुपात व्यवहारांचे प्रमाण वाढले असून ई-वॉलेटचा वापर वाढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातही केंद्र शासनाच्या भीम या ऍपसह पेटीएम कडूनही मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहारांना कॅशबॅकच्या सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांकडून त्याचाही वापर वाढलेला आहे. मात्र, महापालिकेकडून या दोन्ही ऍपला अद्याप “गेट वे’ देण्यात आलेला नाही. त्यामुळे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या काही अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या लेखापाल विभागास प्रस्ताव दिला असून पालिकेचे कर या वॉलेटच्या माध्यमातून स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारण्यास तयारी दर्शविली असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

नागरिकांना मिळणार आणखी सवलत

सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन ई-वॉलेटचा वापर केल्यास कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कॅशबॅकची सुविधा दिली जाते. हे वॉलेट महावितरणकडूनही वापरले जात असल्याने वीज बील भरल्यानंतर नागरिकांना कॅशबॅक मिळते. त्याच धर्तीवर पालिकेचे मिळकतकर भरल्यासही ही सुविधा मिळणार आहे. अनेकदा मिळकतकराची रक्‍कम 5 हजारांच्या आसपास असते, अशा छोट्या रकमा असलेल्या नागरिकांना महापालिकेच्या 5 ते 10 टक्‍के सवलतीसह हे कॅशबॅकचा फायदा झाल्यास डिजीटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)