करभरणा केंद्र आज सुरू राहणार

जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रशासनाचा निर्णय
वसुली उद्दिष्ट – 2,000 कोटी रु.

प्रत्यक्ष वसुली – 1,173 कोटी रु.
 
पुणे – 2018-19 आर्थिक वर्षाचा रविवार हा शेवटचा दिवस असल्याने महापालिकेची करभरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांसह, सर्व संपर्क कार्यालये तसेच मुख्य इमारतीमधील करभरणा केंद्रातील कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करसंकलन विभागास 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून शनिवारअखेर 1,173 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तर, डिसेंबर 2018 पासून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत 5 स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून थकबाकी वसूल केली जात आहे. याशिवाय, बॅंड पथकही थकबाकी वसुलीसाठी तैनात करण्यात आले आहे.

या मोहिमेतून गेल्या दोन महिन्यांत जवळपास 200 कोटींची वसुली करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही जवळपास 800 कोटींची वसुली शिल्लकच असल्याने दि.31 मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त कर वसुलीसाठी प्रशासनाने कंबर कसली असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत करभरणा केंद्र सुरू ठेवली जाणार आहेत. तसेच पथकांच्या माध्यमातूनही जास्तीतजास्त कर वसुलीसाठी नियोजन करण्यात आले असून कर न भरणाऱ्या मिळकतींवर जप्तीचा बडगा उभारला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)