टाकवे – कान्हे रस्ता झाला खडतर

टाकवे बुद्रुक  – आंदर मावळाला जोडणाऱ्या कान्हे फाटा ते टाकवे बुद्रुक रस्त्याच्या साईटपट्टीचे काम निकृष्ट पद्धतीने केल्याने मागील आठवड्याभरापासून सातत्याने वाहने रुतून पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. चांगल्या दर्जाचा मुरुम वापरून साईटपट्टी भरावी, अशी मागणी वाहनचालक करत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने याच रस्त्याच्या कडेला खोदकाम करुन केबल टाकली होती. त्यावेळी माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी आपल्या सहकऱ्यांसमवेत थांबून रस्त्यालगत केबल टाकण्याचे काम बंद पाडले होते. केबल टाकण्याच्या वेळी साईटपट्टी भरण्याचे काम करून देण्याचे आश्‍वासन ठेकेदाराने दिल्यानंतर बाबाजी गायकवाड यांनी माघार घेतली.

त्यानंतर काम पुर्ववत सुरू झाले. परंतु, त्यानंतर केबल टाकलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात मुरुम टाकण्याचे काम केबल ठेकेदाराने केले. परिणामी पावसाळा सुरु होताच रस्त्याच्या कडेने जाणारी अवजड वाहने मुरुमात रुतून बंद पडत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. रुतून बसलेले वाहन क्रेनच्या सहाय्याने काढून वाहन चालकांना पुढे प्रवास करावा लागत असल्याने मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरुन जाणारे अवजड वाहन चालक, मोटार सायकल, एसटी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सेवा फाउंडेशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन तातडीने साईटपट्टीचे काम करावे अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सेवा फाउंडेशचे माजी अध्यक्ष चद्रकांत असवले यांनी दिली.

रस्त्यालगत खोदकाम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. यापुढे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने साईटपट्टी दुरुस्ती काम करून घेणे गरजेचे आहे.
– बाबाजी गायकवाड, माजी उपसरपंच, टाकवे ग्रामपंचायत.

संबंधित कामाची पाहणी करून ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी साईटपट्टी भरण्याचे काम हाती घेतले आहे. लवकरच हे काम पुर्ण करण्यात येईल.
– राकेश सोनवणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)